Harshwardhan Jadhav : हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांकडून अटक

नागपूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही वर्षांपूर्वी सरकारी कामात अडथळा निर्माण केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या विरोधात अनेक वॉरंट देखील काढले होते. मात्र, ते हजर होत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर नॉन बेलेबल वॉरंट काढण्यात आल्यानंतर नागपूर पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले.
हर्षवर्धन जाधव आज नागपूर न्यायालयात उपस्थित झाल्यावर नागपूर पोलिसांनी न्यायालयाच्या निर्देशावरुन त्यांना ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना तुरुंगात नेण्याचे निर्देश दिले आहे, त्यामुळे पोलिसांकडून कायदेशीर सोपस्कार पार करत त्यांना रीतसर अटक करुन तुरुंगात पाठवण्याची दाट शक्यता आहे. मात्र, हर्षवर्धन जाधव यांच्या छातीत वेदना होत असल्याने त्यांना पुढील २४ तास पोलिसांकडून अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे.
हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभेचे माजी आमदार असून माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांचा त्यांची पत्नी संजना जाधव यांच्याकडूनच पराभव झाला आहे.





