राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंच्या ‘त्या’ विधानामुळे पक्षातील अंतर्गत कलह समोर

जयपूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजस्थानातील भारतीय जनता पार्टीत सर्व काही ठिकठाक सुरू नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या एका विधानामुळे अंतर्गत कलहाच्या चर्चांवर शिक्कामोर्तबच झाले आहे. राजकारणात निष्ठावानांचा तो काळ वेगळा होता.
तेंव्हा कोणाला पुढे करणाऱ्याला आदर जाण्यास पाठबळ देणाऱ्याचा आदर केला जात होता आणि त्याला कायम साथ दिली जायची. मात्र आता तसे होत नाही. आज ज्याचे बोट धरून चालायला शिकलो त्याचेच बोट कापण्याचा लोक प्रयत्न करतात, असे विधान वसुंधरा राजे यांनी केले असून त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. राजकीय जाणकार या विधानाकडे राजे यांनी भाजपचे श्रेष्ठी आणि राज्यातील नेत्यांवर केलेली टीका या दृष्टीकोनातून पाहत आहेत.
वसुंधरा राजे राजस्थानातील भारतीय जनता पार्टीचा एक मोठा चेहरा आहेत. असे असूनही त्या लोकसभा निवडणुकीत फारशा सक्रिय दिसल्या नाहीत. त्याही अगोदर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यावर जेंव्हा सरकार स्थापन करण्याची जुळवाजुळव सुरू झाली तेंव्हा मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधरा राजे यांचेच नाव सगळ्यांत आघाडीवर होते. मात्र त्यांना डावलून भजनलाल शर्मा या नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली. हे सुध्दा राजे यांच्या नाराजीचे एक कारण असू शकते.
दरम्यान, राजे यांची ताजी वक्तव्ये ही भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींना उद्देशून असल्याचे मानले जात आहे. तर काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार राजस्थान सरकारमधील मंत्री दिया कुमारी आणि राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या दिशेने राजे यांचा रोख आहे. जयपूरच्या राजघराण्याशी संबंधित असलेल्या दिया कुमारी यांना एकेकाळी राजे यांच्या निकटवर्तीय मानले जायचे. मात्र राजे यांच्या मागच्या कार्यकाळात त्यांच्या संपत्तीवर बुलडोझर चालवण्यात आला तेंव्हापासून या दोन नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे मानले जाते. सूत्रांच्या म्हणण्यानुसार भारतीय जनता पार्टी दीया कुमारी यांना वसुंधरा राजे यांचा पर्याय म्हणून तयार करत आहेत व राजे यांनाही त्याची कल्पना असल्यामुळे नाराजी वाढतच गेली.
दिया कुमारी यांना आता उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री भैरोसिंह शेखावत यांचे राजकीय वारस आणि ज्येष्ट नेते नरपत सिंह राजवी यांनी निवडणुकीच्या तोंडावर जयपूर राजघराण्याच्या संदर्भात वादग्रस्त टिप्पणी केली नसती तर दिया कुमारी यांनाच मुख्यमंत्री करण्याची पक्षाची तयारी झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजे गट दुबळा झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपची राजस्थानातील कामगिरी फारशी चांगली झाली नसल्यामुळे आता वसुंधरा राजे गटाला पुन्हा बळ मिळते आहे.





