Balwant Singh Sodha : मुंबईचा माजी क्रिकेटपटूला पोलिसांनी केली अटक; टी-२० विश्वचषकातील ‘तो’ कारनामा पडला महागात
Balwant Singh Sodha : टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या पडद्यामागे तिकिटांचा मोठा काळाबाजार सुरू होतो. जो आता उघड झाला आहे.

Former Mumbai U-19 cricketer Balwant Singh Sodha arrested : टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या यशोत्सवाच्या वातावरणात आता एक धक्कादायक कायदेशीर प्रकरण समोर आले असून, यामध्ये मुंबईच्या एका माजी क्रिकेटपटूला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या हाय-व्होल्टेज उपांत्य फेरीच्या सामन्यातील तिकिटांचा काळाबाजार केल्याचा खळबळजनक आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारताने न्यूझीलंडचा पराभव करून विश्वविजेतेपदावर तिसऱ्यांदा नाव कोरले. मात्र, या स्पर्धेच्या पडद्यामागे तिकिटांचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचे आता उघड झाले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याच्या तिकिटांची अनधिकृत विक्री केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २६ वर्षीय बलवंत सिंह स्वरूप सिंह सोढा याला अटक केली आहे. बलवंत हा मुंबईच्या अंडर-१९ संघाचा माजी खेळाडू असल्याने या प्रकरणाने क्रीडा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
२५ हजारांना विकली दोन तिकिटं!
🚨 Balwant Singh Sodha arrested in ticket black marketing case
🎟️ Sold semi-final tickets at ₹25,000
👮 Caught in Mumbai Police sting
⚖️ Granted bail#BreakingNews #CricketNews #T20WorldCup2026 pic.twitter.com/XgxqUAX9a2— Kunal Bhanwala (@KunalBhanwala) March 29, 2026
तपासादरम्यान समोर आले आहे की, सोढा याने केवळ दोन तिकिटे २५ हजार रुपयांना विकली होती. पोलिसांनी आतापर्यंत या रॅकेटमधून एकूण २४ तिकिटे जप्त केली असून सोढा हा या प्रकरणातील सातवा आरोपी आहे. सोढा याने २०१९ मध्ये मुंबईच्या अंडर-१९ संघाचे प्रतिनिधित्व केले होते आणि सध्या तो कोचिंग क्षेत्रात सक्रिय होता. आपल्या ओळखीचा आणि क्रिकेटमधील पार्श्वभूमीचा फायदा घेऊन त्याने हा गैरप्रकार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एमसीएला (MCA) पोलिसांचे पत्र –
या तिकीट घोटाळ्याचे मूळ शोधण्यासाठी पोलिसांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पत्र लिहून तिकीट वाटप प्रक्रियेबद्दल स्पष्टीकरण मागवले आहे. सोढाला ही अधिकृत तिकिटे नेमकी कोठून मिळाली आणि यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा शोध घेण्यासाठी त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.
आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक नामांकित खेळाडूंसोबत क्रिकेट खेळलेल्या सोढाच्या अटकेमुळे तिकीट दलालांचे धाबे दणाणले आहेत.





