कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील कारागृहांमध्ये 2023 ते 2025 या कालावधीत सुमारे 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून, यात तत्कालीन अपर पोलिस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि कारागृह विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचा सहभाग असल्याचा दावा शेट्टी यांनी केला. विशेष म्हणजे, या घोटाळ्यावर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय तेजस मोरे यांच्याशी सुपेकर यांच्या कथित कनेक्शनमुळे होत असल्याचा खळबळजनक आरोप शेट्टी यांनी केला आहे. 500 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश राजू शेट्टी यांनी सांगितले की, राज्यातील कारागृहांमध्ये रेशन, कँटीन साहित्य आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. गहू, तांदूळ, साखर, दाळ यासारख्या वस्तू बाजारभावापेक्षा कित्येक पटींनी जास्त किमतीत खरेदी केल्या गेल्या. उदाहरणार्थ, बाजारात 30-35 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेला गहू 45.90 रुपये, 35 रुपये किमतीचा तांदूळ 44.90 रुपये आणि 100 रुपये किमतीची तूरडाळ 209 रुपये प्रति किलोने खरेदी केली गेली. यामुळे सुमारे 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा शेट्टी यांचा दावा आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि गृह सचिव यांच्याकडे लेखी मागणी केली होती. फडणवीसांकडून टाळाटाळ, चौकशी रखडली शेट्टी यांनी आरोप केला की, या घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भेटीची वेळ मागितली, परंतु त्यांनी टाळाटाळ केली. “मुख्यमंत्र्यांना पाच मिनिटांची वेळ मागितली, तरीही भेट मिळाली नाही. मुख्य सचिव आणि गृह सचिव यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले, पण वरिष्ठ पातळीवर प्रकरण असल्याने पाठपुरावा मुख्यमंत्र्यांकडे करावा, असे सुचवले. मुख्यमंत्रीच राज्याचे सर्वोच्च नेते असताना त्यांनी या प्रकरणावर कारवाई टाळून घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला आहे,” असे शेट्टी यांनी ठणकावले. तेजस मोरेचे सुपेकरांशी कनेक्शन शेट्टी यांनी तेजस मोरे यांच्यावर गंभीर आरोप करताना सांगितले की, मोरे यांचे जालिंदर सुपेकर यांच्याशी जवळचे संबंध आहेत. मोरे हे कोणतेही सरकारी अधिकारी किंवा ठेकेदार नसताना कारागृह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून कामे मार्गी लावत असल्याचे समोर आले आहे. “तेजस मोरे यांच्यावर यापूर्वी फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असताना त्यांचा मंत्रालयात जावईसारखा वावर आहे. त्यांच्या गाडीला (MH-01-EJ-2707) मंत्रालयात प्रवेश देताना कोणतीही तपासणी केली जात नाही, जी आमदार-खासदारांनाही लागू आहे,” असा दावा शेट्टी यांनी केला. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना अभय? शेट्टी यांनी फडणवीस यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप केला की, यापूर्वीही बांधकाम कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्ष मुन्ना यादव आणि रायसोनी पतसंस्थेतील 1200 कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य आरोपी सुनिल झंवर यांच्यासारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना फडणवीस यांनी अभय दिले आहे. “जर मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल, तर अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकर, सत्यवान हिंगमिरे, प्रशांत मत्ते, शाहू विभूषण दराडे, गौरव जैन, सुनील ढमाळ आणि अतुल पट्टेकरी यांच्या संपत्तीची ईडी आणि सीबीआयमार्फत चौकशी करावी,” अशी मागणी शेट्टी यांनी केली. घोटाळ्याची चौकशी रखडल्याने संशय शेट्टी यांनी गेल्या तीन महिन्यांपासून या घोटाळ्याची चौकशी व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. “कँटीन, रेशन आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत अनियमितता स्पष्ट दिसत आहे. जेल अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी याबाबत लेखी अहवाल सादर केला, तरीही कारवाई झाली नाही,” असे त्यांनी सांगितले. जालिंदर सुपेकर यांच्यावर यापूर्वीही वैष्णवी हागवणे प्रकरणात आणि 550 कोटींच्या खंडणीच्या आरोपात तपास सुरू आहे, तरीही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने शेट्टी यांनी संशय व्यक्त केला. राजकीय वादळाची शक्यता राजू शेट्टी यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तेजस मोरे आणि जालिंदर सुपेकर यांचे कथित कनेक्शन आणि मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीयांशी असलेला संबंध यामुळे हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे. घोटाळ्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत शेट्टी यांनी हा मुद्दा लावून धरण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. येत्या काळात या प्रकरणाचे राजकीय पडसाद कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.