माजी खासदाराची ठाकरे गटातून हकालपट्टी; ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंची कारवाई

Uddhav Thackeray | नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवारीवरून ठाकरे गटात वाद सुरू आहे. याठिकाणी पक्षाने संगीता पाटील डक यांना उमेदवारी दिली. मात्र पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केला आहे. याबाबत जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्याविरोधात घोषणाबाजी करत ठाकरे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
नांदेडमधील प्रकाराची दखल घेत हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी नांदेडमधील शिवसेना पूर्ण विकून टाकली. पैसे घेऊन उमेदवारी दिली जाते, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख तालुकाप्रमुखपदासाठी पैसे घेतात. याची तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही. कार्यकर्त्यांना विचार केला जात नाही, असा आरोप हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
कोण आहेत सुभाष वानखेडे ?
शिवसेनेच्या तिकिटावर हदगाव विधानसभा मतदार संघातून सुभाष वानखेडे यांनी तीन वेळा विजय मिळविला होता. तर 2009 मध्ये हिंगोली लोकसभा मतदार संघात तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचा तब्बल 75 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी 2019 मध्ये हिंगोली लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्यावेळीही त्यांचा पराभव झाला होता. शिवसेना फुटल्यानंतर वानखेडे ठाकरे गटात सामील झाले होते.
दरम्यान, वानखेडे यांनी हदगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने पक्षाकडे तिकिटाची विनंती केली होती. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही.
हेही वाचा:
ठरलं तर…! अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार ; नेमकी काय आश्वासनं मिळणार ?





