उद्धव ठाकरेंना कोकणात हादरा; माजी आमदार संजय कदम यांचा शिंदे गटात प्रवेश

मुंबई : कोकणात उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना नेते रामदास कदम, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थितीत होते.
संजय कदम म्हणाले की, आपण १९८९ पासून रामदास कदम यांच्या पहिल्या निवडणुकीपासूनच शिवसेनेचे आहोत, त्यामुळे मी आज घरात आल्यासारखे मला वाटतंय येत्या काळात कोकणात रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्येही शिवसेनेचा भगवा फडकेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात कोकणात विकासाला गती मिळाली. आज पुन्हा ते सत्तेत आहेत, त्यामुळे आम्ही रामदास कदम यांच्या मागे उभे राहण्यासाठी पुन्हा शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे, असे संजय कदम म्हणाले.
अनेक बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश
संजय कदम हे एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांची उबाठा शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. मंगळवारी त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. याशिवाय संभाजीनगर जिल्ह्यातील माजी आमदार भाऊसाहेब पाटील -चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबीर भाई खान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर बापू पवार, जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल, पंचायत समितीचे माजी सभापती राजूनाना मगर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. सोबतच, मुंबईच्या भांडुप येथील माजी नगरसेवक उमेश पाटील, माजी नगरसेविका अंजली नाईक, लोचना चव्हाण यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. आगामी निवडणुकीत हे नेते शिंदे गटाच्या विजयात मोलाची भूमिका बजावतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
बोक्याना मिळालेली ही चपराक : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोकण हा बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला असून, प्रथम माजी आमदार राजन साळवी व आज संजय कदम यांच्या घरवापसीमुळे पुन्हा हा बालेकिल्ला मजबूत झाला आहे. ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देणाऱ्या बोक्याना मिळालेली ही चपराक आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना कुणाची याचे उत्तर जनतेने दिले आहे, त्यामुळेच आज दररोज हजारो कार्यकर्ते मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहे.
कोण आहेत संजय कदम ?
संजय कदम हे मुळचे खेड तालुक्यातील चिंचघर येथील आहेत. त्यांनी सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. त्यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद ही भूषवले होते. दरम्यान त्यावेळी त्यांना रत्नागिरी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळू शकले नाही याच मुद्द्यावरून त्यांचे शिवसेनेचे तत्कालीन माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याबरोबर त्यांचे बिनसले होते. परिणामी त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.
नंतर ते २०१४ सूर्यकांत दळवी यांच्या विरोधात निवडणूक लढवून दापोली मतदारसंघाचे आमदार झाले. त्यानंतर २०१९ व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दोन वेळा आमदार योगेश कदम यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. नंतर आता ते पुन्हा शिवसेनेत परतणार आहेत. एकेकाळचे ते रामदास कदम यांचे उजवे हात म्हणून ओळखले जात.





