Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांचे निधन

नांदेड : किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचे वयवर्षे 68 होते. हैदराबाद येथे असताना त्यांचा मृत्यू झाला. उद्या, गुरुवारी, दि. 2 जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता त्यांच्या मूळ गावी किनवट तालुक्यातील दहेली तांडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दिवंगत प्रदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते. पक्ष फुटीनंतरही प्रदीप नाईक हे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. त्यांना महायुतीतील घटक पक्षांकडून ऑफरही आली होती. परंतु ते एकनिष्ठ राहत प्रतिकूल परिस्थितीत किनवट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा निसटता पराभव झाला.
दरम्यान, 1999 मध्ये त्यांनी किनवट विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली. मात्र त्यांना त्यात पराभव पत्करावा लागला होता. पुढे 2004, 2009 आणि 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत सलग तीन वेळा त्यांनी किनवट मतदारसंघात विजय मिळवला होता. किनवट मतदार संघात विकासाभिमुख राजकारण करणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.





