उद्धव ठाकरे गटाचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार; तारीख ठरली?

रत्नागिरी – विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथ होत आहे. महायुती व महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते नाराज आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे अनेक दिवसांपासून नाराज आहेत. ते लवकरच उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते व महत्त्वपूर्ण नेते राजन साळवी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या 3 फेब्रुवारी रोजी राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक नेते नाराज असून इतर पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. आता शिवसेना ठाकरे गटातील नेते राजन साळवी हे देखील मागील अनेक दिवसांपासून नाराज होते. ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत आणखी काही नेत्यांचा महायुतीमध्ये प्रवेश होणार आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याचे मानले जात आहे.
ही बातमी वाचा – महायुतीचं ‘ऑपरेशन टायगर’ काय आहे? उद्धव ठाकरे सेना, काॅंग्रेसला गळती लागणार?
राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये राजन साळवी यांचा पक्षप्रवेश होणार आहे. हा पक्षप्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवय रत्नागिरी जिल्ह्यातील तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुभाष बने आणि लांजा राजापूर विधानसभाचे माजी आमदार गणपत कदम लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, राजन साळवी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) कारवाईची टांगती तलवार आहे. त्यांची आत्तापर्यंत सात वेळा चौकशी करण्यात आली आहे. राजन साळवी यांच्यासह त्यांचे बंधू दीपक साळवी यांच्यासह इतर घरातील लोकांची देखील चौकशी केली आहे. त्यामुळे कारवाईचा ससेमेरा थांबवण्यासाठी ते ठाकरे गट सोडणार असल्याचे बोलले जात आहे. उत्पन्नापेक्षा 118 टक्के जास्त संपत्ती असल्याचा आरोप साळवी यांच्यावर आहे.
राजन साळवी कोण?
राजन साळवी हे कट्टर शिवसैनिक आहेत. रत्नागिरीतील राजापूर मतदारसंघाचे ते माजी आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते खंदे समर्थक आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं तेव्हा साळवी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणं पसंत केलं. विद्यार्थीसेनेपासून त्यांनी राजकीय क्षेत्रात काम सुरु केलं. राजन साळवी हे शिवसेनेचे रत्नागिरीतील पहिले नगराध्यक्ष आहेत. 2009, 2014, 2019 सलग तीनवेळा ते राजपूरमधून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले.





