नवी दिल्ली – शिवसेनेची साथ सोडून 40 आमदारांनी शिंदे गट स्थापन केला. या आमदारांच्या बंडामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर शिंदे गटाने भाजपसोबत राज्यात सत्तास्थापन केली. त्यानंतर आमदारांप्रमाणेच शिवसेनेतील खासदार, आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
मात्र, आता जालना येथुनही मोठी बातमी समोर आली आहे. जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी सोमवारी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो व्हायरल झाल्याने माजी आमदार अर्जुन खोतकर हेदेखील शिंदे गटात सामील होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दिल्लीत अर्जुन खोतकर आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली तेव्हा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, खासदार राहुल शेवाळे, खासदार रोहिदास लोखंडे, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रतापराव जाधव, खासदार धैर्यशील माने, खासदार कृपाल तुमाने आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत हेही उपस्थित होते.
राज्यसभा, राज्यपाल पदाचे आमिष दाखवण्याचे कारस्थान उधळले
मी शिवसेनेतच : अर्जुन खोतकर
अर्जुन खोतकर म्हणाले, हे खरं की माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे. मी माझ्या व्यक्तिगत कामासाठी दिल्लीला आलो आहे. एकनाथ शिंदे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी कार्यक्रमावरून आले आणि योगायोगाने आमची भेट झाली. भेट झाल्यानंतर चर्चा होतेच. मात्र, त्याचे वेगळे अर्थ काढू नये. मी शिंदे गटात जाण्याबाबत काहीही निर्णय बदललेला नाही. माझी एकनाथ शिंदे यांच्याशी केवळ भेट झालीय. भेट झाली याचा अर्थ मी पक्ष बदलला असा होत नाही. मी शिवसेनेतच आहे, असंही अर्जुन खोतकर यांनी नमूद केलं. असं असलं तरी भविष्यातही शिवसेनेतच राहणार का? यावर खोतकरांनी उत्तर देणं टाळलं आहे. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
राष्ट्रपतीपदी विराजमान द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री शिंदेंच्या शुभेच्छा