Newasa News : माजी आमदार मुरकुटेंची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांशी चर्चा; तालुक्याच्या विकासासाठी सहकार्याची ग्वाही
Newasa News : या भेटीदरम्यान नेवासा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. आगामी काळात जनहिताच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केला.

Newasa News : नेवासा विधानसभा मतदारसंघातील विविध लोकहिताचे प्रश्न, विकासकामे आणि पक्ष संघटना बळकटीकरणासंदर्भात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
मंगळवारी (दि. २) झालेल्या या भेटीदरम्यान माजी जिल्हा परिषद सदस्या आशा मुरकुटे, युवा नेते विष्णू मुरकुटे आणि अब्दुल शेख उपस्थित होते. शिष्टमंडळाने मतदारसंघातील विविध विकासकामे, जनहिताचे प्रश्न तसेच पक्ष संघटनेची सद्यस्थिती याबाबतचा आढावा उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर मांडला.
यावेळी मार्गदर्शन करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेशी सातत्याने संपर्क ठेवावा. लोकहिताची कामे प्राधान्याने हाती घेऊन विकासाचा वेग वाढवावा. जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेणाऱ्यांच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मतदारसंघातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या भेटीदरम्यान नेवासा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. आगामी काळात जनहिताच्या प्रश्नांसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केला.




