माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूरात अटक; नेमकं काय आहे प्रकरण?

Harshvardhan Jadhav | कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूरमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अनेक वॉरंट निघूनही ते न्यायालयात हजर राहिले नाही. अखेर न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यामुळे जाधव यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2014 मध्ये नागपूर दौऱ्यावर आले असता, एका हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी हर्षवर्धन जाधव जात होते. तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या शासकीय स्वीय सहाय्यकाला त्यांनी शिवीगाळ करत मारहाण केली होती. त्यामुळे या प्रकरणी त्यांच्यावर सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणावरुन कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात दोषारोपत्र दाखल झाले होते.
न्यायालयात खटला सुरु असताना न्यायधीशांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने त्यांना वारंवार समन्स बजावले होते. मात्र, जाधव न्यायालयात उपस्थित राहत नव्हते. त्यामुळे न्यायालयाने गेल्या आठवड्यात हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अजामीनपात्र नोटीस बजावली होती. अखेर त्यांना सोमवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच उपचारानंतर जाधव यांना मध्यवर्ती कारागृहात नेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
यापूर्वी देखील हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने एका वर्षाची सक्तमजुरी व 10 हजारांच्या दंडाची शिक्षा ठोठावली होती. मात्र औरंगाबाद खंडपीठाने जाधव यांना 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजूर केला होता.
हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभेचे माजी आमदार असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, हर्षवर्धन जाधव हे त्यांची पत्नी संजना जाधव यांच्याकडूनच पराभव झाले होते.
हेही वाचा:
देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलेले ज्ञानेश कुमार कोण आहेत? जाणून घ्या





