माले (मालदिव) – मालदिवमधील न्यायालयाने माजी अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांना भ्रष्टाचार आणि मनी लॉन्डरिंगच्या प्रकरणात दोषी ठरवून 11 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सरकारी तिजोरीतून चोरलेले तब्बल एक दशलक्ष डॉलर वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आल्याचा आरोप अब्दुल्ला यमीन यांच्यावर होता. हे प्रकरण मालदिवमधील आतापर्यंतचे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रकरण आहे.
यमीन यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून व्यावसायिक कारणासाठी खासगी बॅंकेतून एक दशलक्ष डॉलर घेतले. यमीन यांनी माजी खासदार युसुफ नईम यांच्याकडून एक दशलक्ष डॉलरची लाच स्वीकारली होती. लाचखोरीच्या प्रकरणी यमीन यांच्याबरोबर नईम यांच्यावरही खटला चालवला जातो आहे.
युसुफ नईम यांच्या खात्यातील रक्कम अध्यक्ष अब्दुल्ला यमीन यांच्या वैयक्तिक खात्यात जमा होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते आहे. या प्रकरणी 2 जानेवारीपासून गुन्हेगारी न्यायालयात खटला सुरू झाला आणि 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी पूर्ण झाली.
देशाचे माजी अध्यक्ष असलेल्या यमीन यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सर्वात जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती. त्यानुसार 11 वर्षांची शिक्षा आणि दंडाची रक्कम जास्तीत जास्त पाचपट वाढवण्यात येऊ शकत असताना सहापट दंड ठोठावण्यात आला.