नागपूर : राज्यातील बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यात विशेष तपास पथकाने (SIT) मोठी कारवाई केली आहे. नागपूर जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना एसआयटीच्या सायबर सेलने अटक केली असून, त्यांच्यावर १२ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. ‘शालार्थ’ प्रणालीचा गैरवापर- मिळालेल्या माहितीनुसार, हा घोटाळा ‘शालार्थ’ ऑनलाइन वेतन प्रणालीच्या गैरवापरातून करण्यात आला. आरोपींनी संगनमताने बनावट शालार्थ आयडी आणि ड्राफ्ट तयार केले. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या किंवा अपात्र असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावे वेतन आणि इतर आर्थिक देणी लाटून शासनाचे कोट्यवधींचे नुकसान केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत २६ जणांना बेड्या- शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या तक्रारीनंतर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आतापर्यंत २६ जणांना अटक केली आहे. यामध्ये शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी, शाळा संचालक व मुख्याध्यापक, लिपीक आणि शिक्षक यांचा समावेश आहे. पोलीस कोठडीत रवानगी – रवींद्र काटोलकर हे २०२१ ते २०२२ या काळात नागपूर जिल्हा परिषदेत शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. पदावर असताना बनावट ओळखपत्रांची माहिती असूनही त्यांनी कोणत्याही चौकशीशिवाय पगाराचे प्रस्ताव मंजूर केले आणि स्वतःच्या फायद्यासाठी सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला, असा ठपका त्यांच्यावर आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.