Maharashtra Politics : शरद पवारांना दुसरा मोठा धक्का; आणखी एक माजी मंत्री भाजपात जाणार? स्वतःने दिलं स्पष्टीकरण
Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यात पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे.

Maharashtra Politics : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले असताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडली आहे. आपल्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा निराधार असल्याचे सांगत त्यांनी आपण पक्ष सोडणार नसल्याचे ठामपणे स्पष्ट केले. (Maharashtra Politics)
गेल्या काही दिवसांपासून राजेश टोपे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरू शकतात, असे दावे केले जात होते. मात्र या सर्व चर्चांना टोपे यांनी पूर्णविराम दिला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना राजेश टोपे म्हणाले, “माझ्या भाजप प्रवेशाबाबत ज्या बातम्या प्रसारित होत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. मी कुठेही जाणार नाही आणि पक्षातच राहणार आहे.” (Maharashtra Politics)
दरम्यान, मराठवाड्यातील प्रमुख नेते म्हणून ओळख असलेल्या राजेश टोपे यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. विशेषतः मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. मात्र टोपे यांनी स्वतःच भूमिका स्पष्ट केल्याने या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम मिळाला आहे. (Maharashtra Politics)
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा मात्र अधिक जोर धरत आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, तनपुरे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Politics)
विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या राजकीय घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात उत्सुकता वाढली असून पुढील काही दिवसांत आणखी मोठे राजकीय निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)





