छत्रपती संभाजीनगर : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधनसभेच्या पार्श्वभूमीवर कन्नडचे माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते नितीन पाटील यांनी आज राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कन्नडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी लढत पहायला मिळू शकते. मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश पार पडला. कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार नितिन पाटील यांनी काँगेसमधून शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर आता अजित पवार गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. यापूर्वीच त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा लढण्याची ग्वाही दिली होती. मात्र, आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कन्नड मतदारसंघात तिहेरी लढत होणार? कन्नड विधानसभा निवडणूकीत २०१९ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हर्षवर्धन जाधव तर उद्धव ठाकरे गटाकडून उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिंदे गटाकडून नितिन पाटील हे संभावित उमेदवार समजले जात असताना त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने कन्नडची जागा आता महायुतीत शिंदे गटातून अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी हर्षवर्धन जाधव विरुध्द उदयसिंह राजपूर विरुद्ध नितीन पाटील अशी तिहेरी लढत होऊ शकते.