INDIA : माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच पिलू रिपोर्टर यांचे निधन…

मुंबई :- भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच पिलू रिपोर्टर यांचे रविवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांनी 28 वर्षांच्या कारकीर्दीत 14 कसोटी व 22 एकदिवसीय सामन्यांत पंच म्हणून काम पाहिले होते.
1986 साली पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिजच्या मालिकेत इम्रान खान यांनी पिलू रिपोर्टर यांना भारतीय पंच व्ही. के. रामास्वामी यांच्यासह तटस्थ पंच म्हणून काम पाहण्यासाठी आमंत्रीत केले होते.
1990 सालच्या दशकात जागतिक क्रिकेटमध्ये पिलू रिपोर्टर आणि व्ही. के. रामास्वामी हे तटस्थ पंच म्हणून प्रख्यात होते. रिपोर्टर यांनी 1992 सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलियात पंच म्हणून काम केले होते.
पंच म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी रिपोर्टर हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात (एमएसइबी) नोकरीला होते. त्यावेळी मुंबई क्रिकेट संघटनेने घेतलेल्या पंच परिक्षेत ते उत्तीर्ण झाले होते. सुरुवातीला त्यांनी मुंबईतील स्थानिक सामन्यात तर नंतर रणजी करंडकात पंच म्हणून काम केले. त्यांच्या तटस्थ भूमीकेमुळेच ते आंतरराष्ट्रीय पंचही बनले.





