‘भावी मुख्यमंत्री …. ‘ काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला?

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविकास आघाडीकडून दणका बसला. महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकत महायुतीला धोबीपछाड दिला. सांगलीचे बंडखोर खासदार विशाल पाटील यांनी सुद्धा काँग्रेसला पाठिंबा दिल्याने राज्यातील महाविकास आघाडीतील खासदारांची संख्या 31 वर पोहोचली. लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. अशात आता राज्याच्या भावी मुख्यमंत्री नेमका कुठल्या आघाडीच्या होणार यावरून चर्चा रंगली असतानाच सांगलीचे विश्वजीत कदम यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.
नुकतंच सांगलीमध्ये शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलं. या कार्यक्रमाला सांगलीचे खासदार विशाल पाटील, पलूस-कडेगावचे आमदार विश्वजीत कदम यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार विशाल पाटील यांनी विश्वजीत कदम यांची ओळख करून देत असताना “आपल्या जिल्ह्याचे माजी मंत्री, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तसेच पाटील म्हणाले, मुख्यमंत्री व्हायला भविष्यवाणी करावी लागत नाही. त्यासाठी काही पंचांग वगैरे गोष्टी बघाव्या लागत नाहीत.” विशाल पाटलांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला होता.
दरम्यान, विशाल पाटलांच्या या वक्तव्यानंतर विश्वजीत कदम यांनी देखील भाषण केलं. यावेळी कदम म्हणाले,’बोलण्याच्या ओघात खासदार विशाल पाटील यांनी माझा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला. परंतु. याची कोणीही बातमी करू नका. याची बातमी केली तर सगळं जग बाजूला राहील आणि दुसरीच यंत्रणा माझ्या मागे लागेल.” कदमांच्या या वक्तव्यावरही उपस्थितांनी हसून दाद दिली.
या दरम्यानच्या क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे.





