नवी दिल्ली – भारताचे माजी फुटबॉलपटू आणि 1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघातील सदस्य सय्यद शाहिद हकीम यांचे रविवारी निधन झाले. त्यांचे वयवर्षे 82 होते. कर्नाटकातील गुलबर्गा येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हकीम साब या नावाने ते परिचीत होते.
सय्यद शाहिद हकीम यांना काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज (रविवारी) सकाळी साडेआठ वाजता रुग्णालयात त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांची पत्नी सादिया सय्यदा यांनी दिली.
भारतीय फुटबॉलशी त्याच्या पाच दशकांहून अधिक काळ संबंध होता. द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त सय्यद हकीम हे दिल्लीतील 1982च्या आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान स्वर्गीय पीके बॅनर्जी यांचे सहाय्यक प्रशिक्षकही होते. तसेच एका स्पर्धेदरम्यान ते राष्ट्रीय संघाचे प्रभारीही होते.
देशांतर्गत स्तरावर प्रशिक्षक म्हणून त्यांची सर्वोत्तम ओळख होती. त्यांनी 1998मध्ये महिंद्रा अँड महिंद्राला डुरंड कप जेतेपदासाठी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी साळगावकर आणि हिंदुस्थान एफसीचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.
त्यांना प्रतिष्ठित ध्यानचंद पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे. भारतीय हवाई दलाचे माजी स्क्वाड्रन लीडर, हकीम हे भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे प्रादेशिक संचालक होते आणि त्यांची शेवटची नेमणूक 2017मध्ये अंडर-17 फिफा विश्वचषकापूर्वी स्काउटिंगचे प्रभारी प्रकल्प संचालक म्हणून करण्यात होती.