Jahanara Alam Accuse : बांगलादेशच्या क्रिकेटपटूचा धक्कादायक खुलासा; माजी मॅनेजरवर लैंगिक छळाचे गंभीर आरोप!

बीसीसीबीने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, बोर्डाने महिला क्रिकेट संघाच्या एका माजी सदस्याने केलेल्या आरोपांवर गहन चिंता व्यक्त केली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने, तथ्यांचे निःपक्षपातीपणे मूल्यांकन करण्यासाठी एका स्वतंत्र तपास समितीची स्थापना करण्यात आली आहे.
१५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश –
बोर्डाने आश्वासन दिले आहे की, खेळाडू आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, आदरपूर्ण आणि व्यावसायिक वातावरण कायम ठेवण्यासाठी ते कटिबद्ध आहेत आणि चौकशीच्या निष्कर्षांवर आधारित निर्णायक कारवाई केली जाईल. बीसीबीने या समितीला १५ कार्यदिवसांच्या आत आपला अहवाल आणि शिफारसी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून, समिती पुढील दोन आठवड्यांत आपला अहवाल सुपूर्द करेल.
हेही वाचा – IND vs PAK : पावसाच्या खेळात भारताचा रोमांचक विजय! पाकिस्तानला अवध्या २ धावांनी लोळवले
जहाँआरा आलमचे आरोप काय आहेत?
जहाँआरा आलमने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की, टीम मॅनेजर मंजरुल इस्लाम यांनी तिच्याशी अयोग्य व्यवहार केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, ते परवानगीशिवाय तिच्या खांद्यावर हात ठेवत असत आणि तिला अस्वस्थ वाटेल अशा खासगी गोष्टी बोलत असत. याव्यतिरिक्त, मंजरुल इस्लाम हे हस्तांदोलन करण्याऐवजी तिला मिठी मारण्यासाठी पुढे येत असत.
विशेष म्हणजे, ही सर्व कृत्ये अनेकदा संघातील इतर खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतही घडली, असे जहाँआराने सांगितले. जहाँआराने या घटनेची तक्रार बीसीबीचे माजी संचालक शफीउल इस्लाम नादेल आणि बोर्डाचे सीईओ निजामुद्दीन चौधरी यांच्याकडे केल्याचेही नमूद केले.
जहाँआरा आलमची ओळख –
जहाँआरा आलम ही बांगलादेशातील सर्वात प्रतिष्ठित महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तिने देशासाठी 52 एकदिवसीय सामन्यांतून 48 आणि 83 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांतून 60 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, ती महिला टी-20 चॅलेंज आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील फेयरब्रेक इनव्हिटेशनल टी-20 टूर्नामेंटमध्ये भाग घेणारी एकमेव बांगलादेशी खेळाडू आहे.





