श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का? माजी नगरसेवकांनी काँग्रेसचा ‘हात’ सोडला, भाजपात करणार प्रवेश

अहिल्यानगर : श्रीरामपुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी ‘हात’ सोडून कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवारी (दि.१५) मुंबईत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासह जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. श्रीरामपूर तालुक्यातील काँग्रेसचे तसेच ससाणे गटाच्या कट्टर समर्थकांसह माजी नगरसेवक भाजप प्रवेश करणार असल्याने काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी नगराध्यक्ष संजय फंड, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास विहाणी, आशिष धनवटे, मनोज लबडे, राजेंद्र आदिक, श्यामलिंग शिंदे, शशांक रासकर यांच्यासह आठ ते बारा पदाधिकारी आज भाजपात प्रवेश करणार आहेत.
श्रीरामपूर शहर व तालुक्यात काँग्रेसचा अभेद्य गड पोखरून काढून भाजपाची ताकद वाढविण्याचे यशस्वी पाऊल या सोहळ्याने पडणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना बराच वेळ असला तरी भविष्यातील राजकीय सारीपाटावर मांड पक्की करण्यासाठी हा सोहळा होत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, चार वर्षांपासून पालिकेच्या निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुका कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काँग्रेसचा हात सोडून ससाणे गटातील अनेकजण भाजपात प्रवेश करण्याची चर्चा सुरू होती. काँग्रेसनेही विधानसभेसाठी हेमंत ओगले यांना उमेदवारी देत विश्वास टाकला. ससाणे यांनी तो विश्वास सार्थ ठरवीत ओगले यांना आमदार म्हणून निवडून आणले. मात्र, राज्यात आणि केंद्रात भाजपची आणि सत्ता मंत्री राधाकृष्ण विखे व डॉ. सुजय विखे यांचे श्रीरामपूरवर असलेले लक्ष पाहता काँग्रेस नगरसेवकांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का
भारतीय जनता पक्षाकडून कोल्हापुरात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला जाण्याची शक्यता आहे. संजय घाटगे हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यातच आता मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संजयबाबा घाटगे पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा न देता राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना साथ दिली होती. त्यामुळे संजय घाटगे यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जात नसल्याचा सवालही उपस्थित केला जात होता. संजय घाटगे यांनी त्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांना पाठिंबा देणं अपेक्षित होते. पण त्यांनी महाविकास आघाडीत असूनही मुश्रीफांसाठी काम केल्याची चर्चा होती.





