T.N.Seshan : माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांना भारतरत्नने सन्मानित करावे; ‘या’ खासदाराने केली मागणी

नवी दिल्ली : माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांना गौरवण्यात यावे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मान जाहीर केला जावा, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी राज्यसभेत केली. विरोधकांकडून सातत्याने निवडणूक प्रक्रियांमधील अनियमिततांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यावरून ते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
त्याबाबतीत तृणमूलचा आक्रमक पवित्रा नेहमीच समोर आला आहे. अशात गोखले यांनी मंगळवारी राज्यसभेत शून्य प्रहरावेळी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीचा विषय मांडला. शेषन यांनी कुठलीही भीती न बाळगत, कुणालाही अनुकूलता न दाखवत कार्य केले. त्यांनी निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य अधोरेखित केले. तसेच, आयोगाची प्रतिष्ठा वाढवली. शेषन यांनी अतिशय कठोरपणे आचारसंहितेची अंमलबजावणी केली.
त्यांनी आचारसंहितेला निवडणुका न्याय्य आणि निष्पक्षपणे होण्यासाठी महत्वाचे साधन बनवले. मात्र, आता निवडणूक आयोगाला सरकारनियुक्त संस्थेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आज सरकारकडून निवडणूक आयुक्तांची थेट नियुक्ती होते. निवड समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे बहुमत असते. आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेला महत्व उरत नाही, असे ते म्हणाले.





