Dr. Gopalrao Patil : भाजपचे माजी खासदार काळाच्या पडद्याआड! लातूरमध्ये शोककळा
Dr. Gopalrao Patil : भाजपचे माजी खासदार डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचे निधन झाले असून, लातूर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Dr. Gopalrao Patil : एक दुःखद बातमी समोर आली आहे. शिक्षण क्षेत्रात ‘लातूर पॅटर्न’ची ओळख निर्माण करून देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार आणि शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील यांचे आज (मंगळवारी) निधन झाले आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते 94 वर्षांचे होते.
त्यांच्या निधनाने लातूरसह संपूर्ण राज्याच्या शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई पाटील, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांचा मुलगा सच्चिदानंद अमेरिकेत आयटी कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे. मुलीही विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. Dr. Gopalrao Patil
3 ऑक्टोबर 1931 रोजी डॉ. गोपालराव पाटील यांचा जन्म झाला. त्यांनी व्यावसायिक आयुष्यात बालरोगतज्ज्ञ म्हणून काम केले. मात्र, शिक्षण क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिले. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी लातूरमध्ये शिक्षणाचे मजबूत जाळे उभे केले. याच प्रयत्नांतून पुढे ‘लातूर पॅटर्न’ उदयास आला, ज्यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली आणि अनेकांनी डॉक्टर, इंजिनिअर व अधिकारी म्हणून यश मिळवले.

Dr. Gopalrao Patil : भाजपचे माजी खासदार काळाच्या पडद्याआड! लातूरमध्ये शोककळा
राजकीय क्षेत्रातही त्यांचे योगदान लक्षणीय होते. मराठवाड्यात भाजपचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्याविरोधात अनेकदा निवडणुका लढवल्या. 1991 ते 1999 दरम्यान त्यांनी चार वेळा लोकसभा निवडणूक लढवली होती. विशेषतः 1998 मधील त्यांचा पराभव अत्यंत निसटता ठरला होता. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यसभेवरही संधी देण्यात आली होती. डॉ. पाटील यांना वाचन, प्रवास आणि गझलांचा विशेष छंद होता. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत आणि फ्रेंच या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं.
डॉ. पाटील यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता लातूरमधील नवीन एमआयडीसी परिसरातील शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या क्रीडा मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “लातूरच्या शैक्षणिक क्रांतीचा महामेरू हरपला,” अशा शब्दांत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हेही वाचा : Tea Side Effects: उन्हाळ्यात जास्त चहा पिताय? हे साइड इफेक्ट्स जाणून घेतले तर आजच कमी कराल!





