भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांचा ठाकरे गटात प्रवेश

मुंबई : गोंदिया मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज मातोश्रीवर झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप व संघाच्या अनेक कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांना शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कुथे म्हणाले, भाजपमध्ये आमची फसवणूक झाली.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या एका बैठकीतील एका विधानामुळे ही बाब अधोरेखीत झाली. बावनकुळे त्या बैठकीत म्हणाले होते की आज भाजपमधून पाच जण निघून गेले तरी नवीन शंभर जण आपल्यात येतील. त्यामुळे ९५ टक्के आपला फायदाच आहे. आम्ही प्रत्येकालाच खूष ठेऊ शकत नाही. त्यामुळे ज्यांना भाजप सोडून जायचे आहे त्यांनी खुशाल सोडून जावे, असे बावनकुळे यांनी म्हटले होते. त्यातून आम्हाला आमची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने आम्ही भाजपला रामराम केला आहे.
दरम्यान, कुथे यांनी सन 2018 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण तिथे त्यांना न्याय मिळू शकलेला नाही. दरम्यान कुथे यांच्या प्रवेशामुळे गोंदीयात ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. दुसरीकडे जालना जिल्ह्यातील बदनापुरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनीही आपल्या समर्थकांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे.





