प्रभात वृत्तसेवा पुणे – बिबट्यांनी माणसांवर हल्ला करू नये म्हणून शेळ्या आणि बकऱ्या खरेदी करून त्यांना जंगलात बिबट्यांना भक्ष्य म्हणून सोडून देण्याचा अजब फंडा वनमंत्री गणेश नाईक यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितला आहे. हा प्रयोग याआधी एका अधिकाऱ्यांनी केला होता, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बिबट्यांना आता जंगलात आयती मेजवानी मिळणार आहे.बिबट्या आणि मानव संघर्ष अतिशय वाढला आहे.त्यामुळे त्याच्यावर युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहेत. त्याविषयी नाईक यांनी पुण्यात वन भवन येथे बैठक घेतली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी करत असलेल्या उपाययोजनांविषयी माहिती दिली.त्यात त्यांनी शेळ्या- बकऱ्यांना जंगलात सोडण्याच्या कल्पनेविषयी सांगितले.वन विभागात पूर्वी खडसे नावाचे एक अधिकारी होते. वन्य प्राण्यांनी मानवावर हल्ले करू नयेत म्हणून त्यांनी ज्या उपाययोजना सांगितल्या होत्या. त्यातील शेळी, बकऱ्यांना जंगलात सोडणे हा एक उपाय असल्याचे नाईक यांनी सांगितले. वन्य प्राण्यांनी मानवावर हल्ला केल्यानंतर त्याला दिली जाणारी नुकसानभरपाई ही एकाला २५ लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळे हे हल्ले होऊच नयेत, यासाठी हेच पैसे वन विभागाने जर बकऱ्या, शेळ्या खरेदीसाठी वापरले आणि त्यांना जंगलात सोडले, तर बिबटे जंगलाबाहेर, मानवी वस्तीत भक्ष्य शोधण्यासाठी येणारच नाहीत,असे नाईक यांनी सांगितले.या शेळ्या- बकऱ्या जंगलात जाऊन कोणीही चोरू शकतात असे विचारले असता,त्यावरही आणखी अजब फंडा नाईक यांनी सांगितला. ते म्हणाले, की गावात जसे देवाला बैल सोडतात आणि तो देवाचा नंदी आहे असे सांगतात. त्याचप्रमाणे या देवाला शेळ्या- बकऱ्या सोडल्या आहेत, असे लोकांना सांगायचे म्हणजे त्याची चोरी होणार नाही. मंदिरात देवीदेवतांचा दागिन्यांवर,दानपेट्यांवर चोर डल्ला मारतात, तर शेळ्यांविषयी अंधश्रद्धा ठेवली जाणार आहे का, असे विचारले असता, अशा प्रवृत्तीचे लोक समाजात आहेत. त्यामुळे आपण प्रयत्न करणे सोडायचे नाही, असेही नाईक म्हणाले.शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. बकऱ्यांऐवजी त्यांना जंगलात सोडण्याचा विचार केला जाऊ शकतो, याविषयी बोलताना नाईक यांनी असे करणे शक्य नाही. प्राणीमित्रांचा याला विरोध होऊ शकतो त्यामुळे हे शक्यच नाही, असे नाईक यांनी स्पष्ट केले.