कोल्हापुरातील पूरबाधितांना घर बांधकामासाठी 95 हजार रुपयांची मदत

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मौजे चिखली, शिंगणापूर, बळीवडे या गावातील 1989 मधील महापूर आणि 2019 मधील अतिवृष्टीय पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबाला घर बांधण्याकरिता 95 हजार 100 रुपये आणि अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी 6 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासनाने एक कोटी 56 लक्ष 42 हजार 300 रूपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मौजे चिखली, शिंगणापूर, बळीवडे या गावातील 1989 साली महापुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. परंतू पुनवर्सन गावठाणात न जाता मूळ गावठाणात वास्तव्य करीत आहेत. जुलै-ऑगस्ट, 2019 मधील अतिवृष्टी पूरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावठाणातील घरपडझडीमुळे पूर पुनर्वसन गावठाणात वाटप केलेल्या भूखंडावर घराचे बांधकाम करण्याच्या अटीवर मानवतेच्यादृष्टीने 95 हजार 100 रूपये प्रति कुटुंब इतके अनुदान आणि अंशत: पडझड झालेल्या घरांसाठी 6 हजार रूपये प्रति कुटुंब इतके अनुदान दिले जाणार आहे.
दिनांक 8 जुलै 2020 व 12 मे 2021 रोजीच्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीतील निर्णयानुसार 1 कोटी 56 लाख 42 हजार 300 रूपये इतका निधी वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.





