सलग दुसऱ्या दिवशी शेअर निर्देशांकात घट, फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणाकडे लक्ष्य

मुंबई – अमेरिकेची रिझर्व बॅंक असलेल्या फेडरल रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक या आठवड्यात होणार आहे. या अगोदरच फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पाव टक्के वाढ केली आहे. आगामी काळामध्ये आक्रमक व्याजदर वाढ करण्याचे संकेत या बैठकीत मिळण्याची शक्यता आहे. या कारणामुळे जागतिक शेअर बाजाराबरोबरच भारतीय शेअर बाजारातही विक्रीचे वातावरण होते.
त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक कमी पातळीवर बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 84 अंकाने कमी होऊन 56,975 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 33 अंकांनी म्हणजे 0.20 टक्क्यांनी कमी होऊन 17,069 अंकांवर बंद झाला.
टायटन, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, मारुती, स्टेट बॅंक, कोटक बॅंकेच्या शेअरची विक्री झाली. तर पॉवर ग्रिड, टाटा स्टील, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरच्या भावात चार टक्क्यापर्यंत वाढ नोंदली गेली. सेन्सेक्ससंदर्भातील 19 कंपन्यांच्या शेअरचे भाव कमी झाले तर 11 कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. अमेरिकेच्या व्याजदर वाढीमुळे अगोदरच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतातून विक्री करीत आहेत. आता पुन्हा अमेरिका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता असल्यामुळे हे गुंतवणूकदार विक्री चालू ठेवण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी या गुंतवणूकदारांनी 3,648 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. छोट्या कंपन्यांच्या शेअरच्या भावावर आधारित स्मॉल कॅप 0.75 टक्क्यानी तर मिड कॅप 0.40 टक्क्यांनी कमी झाला. ग्राहक वस्तू, दूरसंचार, माहिती-तंत्रज्ञान, वाहन या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर घसरले. धातू आणि ऊर्जा कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. मंगळवारी धार्मिक कारणामुळे शेअर बाजाराचे कामकाज बंद राहणार आहेत.
भारतातील परिस्थिती सकारात्मक
भारताची स्थूल अर्थव्यवस्था उत्तम असल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. एप्रिल महिन्यातील जीएसटी कर संकलन दीड लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांनी विक्री केल्याचे दिसून येते.





