पत धोरणानंतर बँकांचे शेअर कोसळले

मुंबई – रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केल्यानंतर आज शेअर बाजारात बरीच विक्री झाली. विशेषतः बँकांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात घसरन झाल्यामुळे एकूणच निर्देशांक एक टक्क्यांनी कोसळले. पतधोरणात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कसलाही बदल केला.
महागाई कमी करण्यासाठी व्याजदर जास्त पातळीवर ठेवण्याची गरज व्यक्त केली. बँकाबरोबरच व्याजदराशी संबंधित वाहन क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरच्या भावातही घट झाली. रिझव्हर्र् बँक व्याजदर कपातीचे वेळापत्रक सुचित करेल असे गुंतवणूकदारांना वाटले होते. मात्र त्यावर बँकेने कसलेही भाष्य केले नाही. यामुळे बँकांच्या उत्पन्नावरील नकारात्मक परिणाम कायम राहण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 723 अंकांनी कोसळून 71,428 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 212 अंकांनी म्हणजे 0.97 टक्क्यानी कोसळून 21,711 अंकावर बंद झाला.
व्याजदराशी संबंधित रिअॅल्टी आणि इतर क्षेत्राच्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. मात्र ऊर्जा आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे निर्देशांक वाढले. देशातील आणि परदेशातील परिस्थिती अनिश्चित आहे. रिझव्हर्र् बँकेने महागाई चार टक्क्याच्या आत रोखण्याचा संकल्प केला असताना ती अजूनही पाच टक्क्यापेक्षा जास्त आहे. अशा परिस्थितीत व्याजदर कपातीची घोषणा करणे परवडणारे नव्हते. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीची शक्यताही खुली ठेवलेली नाही.
आयटीसी, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक, नेस्ले, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फायनान्स, मारुती, एचडीएफसी बँकेच्या शेअरच्या भावात घट झाली. टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाली.
ऊर्जा दूरसंचार माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राचे निर्देशांक थोडेफार वाढले.
अमेरीका, युरोपातील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते. मात्र भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पत धोरणामुळे भारतातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. गुंतवणूकदारांना व्याजदर कपातीची अपेक्षा नव्हती मात्र आगामी काळात कपात कधी होईल याबाबत भाष्य अपेक्षित होते. परदेशी गुंतवरूकदारांनी पुन्हा विक्री सुरू केली असून काल या गुंतवणूकदारांनी 1,691 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.



