Pune : एकता नगरीतील पूरग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन करणार

पुणे : एकता नगरी येथील पूरग्रस्त भागातील नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे, त्यासाठी क्लस्टर डेव्हल्पमेंटच्या प्रस्तावावर महापालिकेने शिक्कामोर्तब केले आहे. त्याअंतर्गत विठ्ठलवाडी (हिंगणे खुर्द) येथील नियोजित सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस महापालिकेच्या जागेवर पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे मंगळवारी सादर केला असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महापालिकेने पूरस्थिती नंतर केलेल्या सर्वेक्षणात निळ्या पूर रेषेसह निळ्या-लाल पूर रेषेच्या आतमध्ये १०३ इमारती आढळून आल्या. त्यामध्ये १ हजार ३८३ सदनिका तर ६७ दुकानांचा समावेश आहे. या इमारतीचे निवासी क्षेत्रफळ हे ८७ हजार ३९९ चौरस मीटर असून, व्यापारी क्षेत्र १ हजार ३४० चौरस मीटर इतके आहे. यावर्षी २५ जुलैला मध्यरात्री खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुठा नदीत पूरस्थिती उद्भवली होती.
त्यानंतर, राज्यभर या पुराची चर्चा झाल्याने या भागात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांंनी हजेरी लावत पुनर्वसनाची मागणी केली होती तर एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील क्लस्टर डेव्हल्पमेंटच्या धर्तीवर या भागाचे पुनर्वसन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, महापालिकेने प्रस्ताव तयार केला असून महापालिका अधिकाऱ्यांनी तो मंत्रालयात सादर केला आहे.
बांधकाम नियमावलीनुसार दाट लोकवस्ती नसलेल्या भागात दोन हेक्टरपेक्षा जास्त भूखंडावर क्लस्टर करता येऊ शकते. ठाण्यात या पद्धतीने राज्य सरकारने क्लस्टर योजना राबविली, त्याच पद्धतीने एकतानगरीमध्ये आराखडा तयार केला जाणार आहे. याप्रकल्पासाठी सुमारे ६९८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
– डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त, पुणे





