मतदारसंघ विकासासाठी कटिबद्ध : आ. रोहित पवार

जामखेड – कर्जत-जामखेड मतदारसंघातील रस्ते, वीज, पर्यटन, आरोग्य आदी प्रलंबित प्रश्न मार्गी लावून मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले. येथील केशर हॉल येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. या वेळी विविध पत्रकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आ. पवार म्हणाले की, मतदारसंघाचा नावलौकिक देशात झाला पाहिजे यादृष्टीने आपले काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. कुसडगाव येथे एसआरपी ट्रेनिंग सेंटर होत आहे. सर्वात मोठा भगवा ध्वज खर्डा येथे फडकत आहे. जलजीवन मिशनमध्ये मतदारसंघाचा पहिला क्रमांक लागतो. याचबरोबर रस्ते, वीज, पर्यटन, आरोग्य असे जनतेला अपेक्षित असणारे विकासाचे कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून पत्रकार लोकहितासाठी काम करतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने दबाव टाकण्याचे काम करू नये, असे मत व्यक्त केले.
या वेळी दीपक देवमाने, संतोष थोरात, फायकअली सय्यद, सुदाम वराट, वसंत सानप, दत्तात्रय राऊत, नासीर पठाण आदींनी मनोगते व्यक्त केली. पत्रकार नासीर पठाण यांची कन्या दानिया पठाण हिने पत्रकारिता करताना अडचणींचा सामना कशाप्रकारे करावा लागतो हे मनोगतातून मांडले. प्रास्ताविक शितोळे यांनी केले. सूत्रसंचालन समीर मोरे यांनी केले.




