“वडिलांनी माझ्या जन्मानंतर महिनाभर…”; करिश्मा तन्नाने सांगितली कटू आठवण

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. परंतु करिश्मा गेल्या काही काळापासून प्रोजेक्ट्समध्ये कमी दिसत आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती नेहमीच आपले वेगळ्या अंदाजात सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. नुकतेच तिने एका मुलाखतीमध्ये लहानपणीच्या आठवणींबाबत खुलासा केला आहे.
करिश्माचे वडील तिच्या जन्मानंतर नाराज असल्याचे एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. ती म्हणाली की, “जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा माझ्या वडिलांना आनंद झाला नव्हता. कारण त्यांना मुलगा हवा होता आणि एका टिपिकल गुजराती कुटुंबाप्रमाणे त्यांच्यावरही ते दडपण होते. हे मी मोठी झाल्यावर माझ्या आईने मला सांगितले होते. माझा जन्म झाला तेव्हा माझ्या आईने आठवडाभर माझा चेहेरा पाहिला नाही, माझे वडीलही महिनाभर मला पाहण्यासाठी आले नाही. जेव्हा हे मला आईने हे सांगितले तेव्हा मला खूप वाईट वाटले होते.”
पुढे करिश्मा म्हणाली, “माझ्या वडिलांचे माझ्यावर प्रेमच नव्हते असा त्याचा अर्थ होत नाही. तर दुसऱ्यांदा सुद्धा मुलगी झाल्याने ते नाराज झाले होते. त्यांच्यावर कुटुंबाचं दडपण होते, कारण मुली असल्याने आम्हाला कशी वागणूक मिळणार आहे याचा त्यांना अंदाज आला होता. आईला दोन मुली असल्याने माझे आजी-आजोबासुद्धा आम्हाला चांगली वागणूक देत नव्हते. या परिस्थितीमुळेच मी खंबीर झाले. त्यानंतर मी माझ्या वडिलांना सांगितले की मी तुमचा मुलगा होऊन दाखवेन आणि मी ते करून दाखवले आहे.”
करिश्मा शेवटची वेब सीरिज ‘हुश हुश’ मध्ये दिसली होती. या मालिकेत त्याच्याशिवाय जूही चावला, आयेशा जुल्का, कृतिका कामरा, शहाना गोस्वामी, सोहा अली खान आणि निशा जिंदाल यांसारख्या स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या मालिकेत करिश्मा एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. लवकरच ती हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कूप’ ही वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.





