Food Price Hike : साताऱ्यात महागाईचा भडका! सर्वसामान्यांचा नाश्ता महागला; चहा, वडापाव, समोशाचे दर वाढले
Food Price Hike : कमर्शिअल गॅस सिलिंडर आणि पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींचा हॉटेल व्यवसायाला मोठा फटका; १० रुपयांचा चहा १५, तर १५ रुपयांचा वडापाव २० रुपयांवर.

Food Price Hike – कमर्शिअल गॅस सिलिंडरच्या किंमती तसेच पेट्रोल, डिझेलच्या दरात झालेल्या दरवाढीचा परिणाम हॉटेल आणि नाष्टा सेंटरवर झाला आहे. चहा, वडापाव, समोसा ते नाष्टा, जेवणाच्या थाळीपर्यंत सर्वच वस्तूंचे दर कमालीचे वाढलेले आहेत. त्याचा सर्वात जास्त फटका सर्वसामान्याच्या खिशाला बसणार आहे. विद्यार्थ्यासह नोकरी करणाऱ्यांचे मासिक बजेट कोलमडले आहे.
गेल्या काही दिवसापुर्वी कमर्शिअल गॅसचे दर 200 रुपयांनी वाढले. तेव्हा हॉटेल व्यवसायिकांनी 10 ते 20 रुपये दरवाढ केली होती. ही वाढ पाहून ग्राहकांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या होत्या. ही दरवाढ परवडणारी नाही असे अनेकांनी व्यवसायिकांना बोलून दाखविले. महागाई कमी होताच दर कमी करण्याचे आश्वासन व्यावसायिकांनी दिले. परंतु, युद्धामुळे महागाईत आणखी भर पडली.
गेल्या काही दिवसात पेट्रोल, डिझेल दर चार वेळा वाढले. गॅस सिलिंडरचे दर वाढून एक हजार रुपये झाले. यामुळे व्यवसायिक आणखी संकटात सापडले आहेत. इंधन दरवाढीमुळे भाजीपाला, पावाचे पदार्थ, किराणा, खाद्य तेल तसेच इतर जीवनावश्यक वस्तूच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य आता महागाईच्या कोंडीत सापडले आहेत. आता दहा रुपयांचा चहा 15 रुपयांना झाला आहे.
15 रुपयांचा वडापाव 20 रुपयांना झाला आहे. किराणामालाचे दर 5 ते 10 रुपयांनी वाढले आहेत. खाद्य तेलही लिटर मागे 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. पावशेर भाजीमागे तर दहा ते 20 रुपये वाढले आहेत. फळांचीही दर वाढ झाली आहे. हे दर ऐकून सर्वसामान्य हतबल झाले आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी अवस्था झाली आहे.
गृहिणींचे तर बजेट कोलमडल्याने महिनाअखेरीस तारेवरची कसरत करावी लागत आहे. मे महिना संपून आता जून महिना सूरु होणार आहे. जून महिन्यात शाळा सरसु होणार आहे. आपल्या मुलांना दरवर्षी नवीन दप्तर ते शैक्षाणिक साहित्य घेणार पालक आता ठराविक साहित्य खरेदीवर भर देत आहेत. जेवढी जास्त बचत करता येईल याचा प्रयत्न घराघरांत सुरु आहे.
विद्यार्थ्यासह नोकरी करणा-याचे बजेट कोलमडले
उच्च शिक्षण घेण्यासाठी काहीं विद्यार्थी मुंबई- पुणे तसेच इतर शहरांत शिकत आहेत. त्याचे खोली भाडे, खानावळ यांचे बजेट ठरले होते. परंतु, दरवाढीने हे बजेट कोलमडले आहे. यापेक्षा जास्त कठीण अवस्था नोकरी करणाऱ्या परंतु घरापासून दूर राहणाऱ्यांची आहे. पगारातून घर खर्च तसेच खोली भाडे, खानावळीचे बजेट ठरवून ठेवले होते. दर महिन्याला ते पैसे देऊन उरलेली बचत बॅकेत ठेवण्यात येत होती. परंतु, दरवाढ झाली तरी पगार तेवढाच असल्याने आता बचत करण्याचा विषयाच संपला आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.


