Kolhapur News : कोल्हापुरात अन्नपदार्थातून विषबाधा; 700 हून अधिक लोकांना मळमळ अन् उलटीचा त्रास

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी येथे मोठी विषबाधेची घटना घडली आहे. महाप्रसादाच्या खिरीतून ही विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकृती खालावलेल्या सर्वांना इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी अन्न पदार्थातून विषबाधा झाल्याची माहिती दिली आहे. तब्बल 700 हुन अधिक नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे. सद्यस्थितीत रुग्णालय अतिदक्षता विभागात 3 जणांवर उपचार सुरू आहेत.तर 187 जणांवर प्राथमिक उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
नेमकं काय घडलं?
शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावची यात्रा सुरू आहे. यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आज पहाटे 4 वाजल्यापासून अचानक ग्रामस्थांना उलटी- संडास- मळमळ असा त्रास जाणवू लागला. त्यानंतर सर्वाना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गावातील आणखीन काही ग्रामस्थांना त्रास जाणवू लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गर्दी केली. तेव्हा यात्रेतील अन्नपदार्थ खाल्ल्याने विषबाधा झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
या घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. यात्रेत स्टॉलवरील खाद्यपदार्थांमध्ये काही समस्या असू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रशासनाने संपूर्ण परिसरातील अन्नपदार्थ तपासणीसाठी नमुने घेतले आहे. त्यांचे अहवाल लवकरच हाती येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका आरोग्य विभागाने पाचशे कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून शिवनाकवाडी गावातील घरोघरी फिरून ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करत आहेत. लक्षणे आढळून येणाऱ्यांवर तात्काळ औषध उपचार केले जात आहेत, अशी माहिती मिळत आहे.





