Wedding Food Poisoning : लग्नाचा आनंद ठरला काळ? ६० जणांना जेवणातून विषबाधा; पुरंदर तालुक्यातील धक्कादायक घटना.
Wedding Food Poisoning : गुलाबजाम अन् बटाटा वडा पडला महागात! जेवणानंतर काही तासांतच रुग्णांची संख्या ६० पार; जेजुरी, सासवड आणि बेलसरमधील रुग्णालये फुल्ल.

Wedding Food Poisoning – आनंदाचा सोहळा ठरावा असा लग्नसमारंभच नागरिकांच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यात उघडकीस आली. नाझरे सुपे व सोमर्डी परिसरात (दि.३) मे रोजी झालेल्या लग्नसोहळ्यात दिलेल्या जेवणातून तब्बल ६० हून अधिक नागरिकांना अन्नविषबाधा झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. निष्काळजीपणा, अन्नाची निकृष्ट गुणवत्ता यामुळे हा प्रकार घडल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बेलसर, जेजुरी, सासवडमध्ये विष बाधा झालेल्यांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे व जिल्हा परिषदेच्या सदस्या रूपाली झेंडे यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली. लग्नसमारंभात भाजी, गुलाब जामून, बटाटा वडा आदी पदार्थ मोठ्या प्रमाणावर दिले गेले. मात्र, हेच पदार्थ खाल्ल्यानंतर काही तासांतच नागरिकांना उलटी, जुलाब, पोटदुखी अशी तीव्र लक्षणे दिसू लागली. सुरुवातीला किरकोळ वाटणारा त्रास काही वेळातच गंभीर स्वरूप धारण करत गेला. रुग्णसंख्या झपाट्याने वाढली.
परिणामी गावात एकच गोंधळ उडाला.
घटनेनंतर आरोग्य यंत्रणा जागी झाली तरी सुरुवातीचा प्रतिसाद उशिरा मिळाल्याची टीका होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर व उपकेंद्र गारडे येथील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत उपचार सुरू केले. मात्र, मोठ्या कार्यक्रमात अन्नाची तपासणी आधी का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या एकूण बाधित रुग्णांची संख्या ६२ वर पोहोचली असून त्यापैकी २८ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे,
तर काहींना उपचारानंतर घरी सोडले आहे. १२ रुग्णांना आयव्हीद्वारे उपचार दिले असून काही गंभीर रुग्णांना सासवड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांवर स्थानिक पातळीवर उपचार सुरू आहेत. सोमर्डी परिसरातील रुग्णांची स्थिती चिंताजनक होती. मोरया हॉस्पिटलमध्ये १० रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी २ जणांची प्रकृती गंभीर होती. युनिटी हॉस्पिटलमध्ये २ रुग्णांना थेट अॅडमिट करावे लागले.
धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सर्वाधिक ताण जनहितार्थ हॉस्पिटलवर आला असून ३१ रुग्णांवर उपचार केले. त्यापैकी २० रुग्णांना अॅडमिट करावे लागले. नाझरे सुपे येथेही परिस्थिती वेगळी नव्हती. ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथे २ रुग्ण दाखल झाले, तर काहींनी खाजगी दवाखान्यांचा आधार घेतला. प्राथमिक आरोग्य केंद्र बेलसर येथे काही रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर १२ नागरिकांना घरभेटीद्वारे उपचार देण्यात आले.
या सगळ्या परिस्थितीत गावोगावी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आरोग्य विभागाने आता घरोगरी सर्वेक्षण मोहीम सुरू केली असली तरी हा उपाय उशिरा घेतल्याची चर्चा रंगली आहे. किरकोळ लक्षणे असलेल्या नागरिकांवर उपचार सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
“जिल्हा आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थिती हाताळली जात असून परिस्थिती सध्या नियंत्रणामध्ये आहे सर्वेक्षण सुरू ठेवणार आहोत.”
– डॉ विक्रम काळे तालुका वैद्यकीय अधिकारी.






