नाशिकमध्ये ‘एफडीए’ ची मोठी कारवाई ! तब्बल ‘इतके’ किलो बनावट पनीर केले जप्त

नाशिक : नाशिकमध्ये एफडीएकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. सिन्नर येथील मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील दुध व दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या मे. यशवी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस मुसळगाव एमआयडीसी, या कंपनीत गुरुवारी सायंकाळी एफडीएकडून धाड टाकण्यात आली. या धाडीत 314 किलो भेसळयुक्त पनीरसह भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
314 किलो बनावट पनीर जप्त
अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सदर कारखान्याची अन्न सुरक्षा मानके कायदयांतर्गत सखोल तपासणी केली असता त्याठिकाणी पनीर बनवितांना रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा वापर करताना आढळल्याने सुवर्णा महाजन यांनी घटनास्थळी उत्पादित 53 हजार 380 रुपये किंमतीचा 314 किलो पनीरचा साठा जप्त केला. तसेच पनीर बनविण्यासाठी घटनास्थळी असलेल्या रिफाईंड पामोलिन तेल, व्हे परमिट पावडर, ग्लिसॉरॉल मोनो स्टेअरिट या भेसळकारी पदार्थांचा साठा नमुने घेवून जप्त केला.
‘या’ अधिकाऱ्यांनी केली कारवाई
ही कारवाई सहआयुक्त नाशिक विभाग शैलेश आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) उदयदत्त लोहकरे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता) अविनाश दाभाडे व अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन, योगेश देशमुख, नमुना सहायक विकास विसपुते, वाहनचालक साबळे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.





