नियम पाळा, अन्यथा थेट गुन्हे

गणेशोत्सव : ढोल-ताशा पथकांना पोलिसांची तंबी

पुणे – गणेशोत्सव आणि ढोल ताशा पथके हे शहरातील समीकरण आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये जोशात वादन व्हावे, अशी प्रत्येक ढोल-ताशा पथकांची इच्छा असते. मात्र यंदाच्या गणेशोत्सवातही त्यांना पुणे पोलिसांच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. या नियमांचे पथकांकडून उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

पुणे पोलीस आणि ढोल-ताशा पथकांचे प्रतिनिधी, महासंघाचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली. यावेळी परिमंडळ-1च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. गोरे यांनी यावेळी पथकांना उद्भवणाऱ्या समस्या आणि त्यांची मागणी ऐकून घेतली. पथकांनी सर्व नियमांचे पालन करून, मिरवणुकीत सहभागी झाल्यास उत्साहपूर्ण वातावरणात त्यांच्या कलेचे सादरीकरण करता येईल, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. पथकांना उद्‌भवणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. ढोल पथकांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिसांनी त्यांच्यावर निर्बंध घातले आहेत. यंदाही पथकांना 40 ढोल आणि 10 ताशे वाजवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्यामुळे नियमांचे पथकांनी पालन करणे. त्याचबरोबर आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने सराव करावा, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

गणेशोत्सव मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या पथकांनी ढोल-ताशांच्या संख्येसह वेळेचे नियम करणे गरजेचे आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही पथकांनी नियम आणि सूचनांचे पालन करावे. नियम मोडल्यास गुन्हे दाखल करावेच लागतील.
– दीपक लगड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×