Pune District : जिल्ह्यात पहिल्या उचलीकडे लक्ष
Pune District : कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर पुणे जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांना किती पहिली उचल देणार, याची चर्चा सुरू झाली आहे. चालू गळीत हंगामाला सुरुवात होऊन अनेक कारखान्यांनी गाळपाला वेग दिला आहे.

वरवंड : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दरावरून सुरू असलेला संघर्ष अखेर संपुष्टात आला असून, प्रतिटन ४२०० रुपयांच्या दराच्या सूत्रावर तोडगा निघाल्यानंतर शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेतले आहे. तब्बल ६१ तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या आंदोलनानंतर पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूकही पूर्ववत झाली आहे. आता या घडामोडीनंतर पुणे जिल्ह्यातील साखर कारखानदारीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर पुणे जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांना किती पहिली उचल देणार, याची चर्चा सुरू झाली आहे. चालू गळीत हंगामाला सुरुवात होऊन अनेक कारखान्यांनी गाळपाला वेग दिला आहे. मात्र ऊसदर आणि पहिल्या उचलीबाबत शेतकऱ्यांमध्ये अद्याप उत्सुकता कायम आहे.
पुणे जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांनी (दि.३१) ऑक्टोबरअखेर १९ लाख ४५ हजार टन उसाचे गाळप केले होते. त्यामध्ये दौंड शुगर्सने ३ लाख २० हजार टन, तर भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने २ लाख टन उसाचे गाळप केले होते. त्यामुळे दौंड तालुक्यातील कारखान्यांच्या कामगिरीसोबतच ऊसदराची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे.
दौंड तालुक्यात दौंड शुगर, भीमा पाटस, साईप्रिया शुगर आणि श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना किती पहिली उचल दिली जाणार, याकडे विशेष लक्ष लागले आहे.
कोल्हापूरच्या दराची पुण्यात चर्चा
कोल्हापूर जिल्ह्यातील चर्चेत ठरलेल्या ४२०० रुपयांच्या दराच्या सूत्रामुळे पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, प्रत्येक जिल्ह्यातील कारखान्यांची आर्थिक परिस्थिती, साखर उतारा आणि इतर घटक वेगळे असल्याने पुणे जिल्ह्यातील कारखानदार काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जिल्ह्यातील साखर सम्राटांची गुळणी
ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, मजुरी, खते, औषधे, वाहतूक आणि मशागतीचा खर्च लक्षात घेता शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता कोल्हापुरातील ऊसदराची कोंडी सुटली असताना पुणे जिल्ह्यातील कारखानदार शेतकऱ्यांच्या अपेक्षांना कितपत प्रतिसाद देतात, पहिली उचल कधी जाहीर करतात आणि ऊस बिलांची रक्कम वेळेत अदा करतात का, याकडे संपूर्ण जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.





