Flyover: उड्डाण पूल नक्की कोणाच्या फायद्यासाठी?
Flyover:

कर्वे रस्ता अरुंद झाल्याने ८० टक्के वाहनचालकांची रोजच कोंडी
Flyover: उड्डाण पुलावरून धावणाऱ्या केवळ २० टक्के व्हीआयपी वाहतुकीसाठी महापालिकेने कर्वे रस्त्यावरील ८० टक्के सर्वसामान्य वाहनचालकांना वेठीस धरले आहे का, असा संतप्त सवाल आता पुणेकर विचारत आहेत.
नळस्टॉप चौकातील कोंडी फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला अटलबिहारी वाजपेयी उड्डाण पूल आता कोथरूडकरांशिवाय इतर मार्गांवरून येणाऱ्या वाहनचालकांसाठी मानसिक त्रासाचा बनला आहे.सहा ते सात लेनची वाहतूक पुढे जाऊन अवघ्या ६ मीटरच्या चक्रव्यूहात अडकत असल्याने हा उड्डाण पूल नक्की कोणाच्या फायद्यासाठी बांधला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे, या हेतूने मेट्रो मार्गिकेसोबतच नळस्टॉप चौकात दुहेरी उड्डाण पूल उभारला. मात्र, यामुळे कोंडी सुटण्याऐवजी ती वाढतच आहे. डेक्कनकडून कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा पूल सोयीचा झाला असला, तरी म्हात्रे पूल आणि लॉ-कॉलेज रोडकडून येणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या नशिबी मात्र रोजची वाहतूक कोंडी आली आहे.
लॉ-कॉलेज रोडवरून दोन लेनमधून आणि म्हात्रे पुलाकडून दोन लेनमधून येणारी वाहने अभिनव चौकात एकत्र येतात. त्यातच डेक्कनकडून येणारी काही वाहने खालच्या रस्त्याने येत असल्याने या तीन लेनच्या वाहतुकीची भर पडते. अशी ही सहा ते सात लेनमधून येणारी वाहतूक एसएनडीटी महाविद्यालय आणि कासट पेट्रोल पंपाजवळ (जिथे पूल उतरतो व चढतो) येताच ३० मीटर रस्त्यावरील वाहतूक अवघ्या ६ मीटरच्या रस्त्यात कोंडली जाते.

तिथून एकावेळी जेमतेम एकच मोठे वाहन पुढे जाऊ शकते. परिणामी, सकाळी आणि संध्याकाळी या भागात वाहनांच्या लांब रांगा लागत आहेत. त्यात बेशिस्त वाहतुकीमुळे वाहने पदपथावरून जात आहेत. त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरासाठी चालकांना तास तासभर कोंडीत अडकून राहावे लागते.
उड्डाण पूल उभारणीच्या वेळी महापालिका प्रशासनाला ही तांत्रिक चूक कशी समजली नाही? आणि जर समजली होती, तर त्यावर वेळीच उपाययोजना का केली नाही? कोथरूडकरांना सुटसुटीत रस्ता आणि इतर मार्गांवरील पुणेकरांना मानसिक त्रास, असा दुजाभाव का? अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
तीन व्हीआयपी नेते तरीही कोंडी Flyover:
या भागात एक केंद्रीय राज्यमंत्री, राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यसभा खासदार अशा तीन लोकप्रतिनिधींचे वर्चस्व आहे. असे असतानाही गेल्या अनेक वर्षांत हा अरुंद रस्ता रुंद करण्यासाठी किंवा येथील वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेल्याचे दिसत नाही. आमचा रस्ता व्हीआयपी झाला, तुमचे तुम्ही पाहा, अशीच काहीशी प्रवृत्ती सत्ताधाऱ्यांकडून दाखवली जात असल्याचे नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
लॉ-कॉलेज रोडवरून उड्डाणपूल का नाही? Flyover:
नळस्टॉप चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने कासट पेट्रोल पंप ते एसएनडीटी दरम्यान उड्डाण पूल उभारण्यात आला. त्यामुळे कोथरूड, कर्वेनगरला जाणाऱ्या वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी महापालिकेच्या अर्धवट नियोजनामुळे इतर बाजूंची वाहतूक मात्र चक्रव्यूहात अडकली आहे.
याच उड्डाण पुलाचे नियोजन करताना जर लॉ-कॉलेज रोडकडून येणाऱ्या वाहनांसाठी एक स्वतंत्र मार्गिका किंवा उड्डाण पूल विकसित केला असता, तर अभिनव चौकात होणारी रोजची भीषण कोंडी नक्कीच दूर झाली असती. दुसरीकडे, डेक्कनकडून एसएनडीटीकडे येणारा उड्डाण पूल सध्या एसएनडीटी बसस्टॉपजवळ खाली उतरतो. हा पूल तिथेच न उतरवता तो थेट पौड फाट्याकडे जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर पुलाला जोडला असता आणि त्याचा एक फाटा कर्वे रस्त्यावर उतरवला असता, तर एसएनडीटी चौकातील कोंडीचा प्रश्न कायमचा मिटला असता.





