Nagar | लालबागचा राजाच्या प्रवासात उड्डाणपुलाचे विघ्न

सोनई, (वार्ताहर)- अहिल्यानगर-छत्रपती संभाजी नगर महामार्गावर घोडेगाव येथील जि.प.मराठी शाळेतील मुलांना रस्ता पार करण्यासाठी लोखंडी उड्डाण पूल उभारला आहे. मात्र, महामार्गावर अवजड वाहतुकीसाठी आता तो अडचणींचा ठरत आहे.
लालबागचा राजा सिंहासनावर आरुढ असलेली २१ फूट उंचीची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी गंगापूर येथे चालली होती.
मात्र, घोडेगाव येथील लोखंडी उड्डाण पूलाची उंची कमी असल्याने लालबागच्या राजाची मूर्ती गंगापूर येथे जाण्यास पुलाच्या उंचीचे विघ्न आडवे आले. विरुध्द बाजूने साईडपट्टी रस्ता जेसीबीने एक फूट खोदून लालबागचा राजा तब्बल दीड तासाच्या प्रतिक्षेनंतर सुखरुप बाहेर पडला.
शनिरी दुपारी दोन वाजता अहिल्यानगर येथून आयशर गाडी ( एम एच १९ सी वाया ८१५१) या वाहनामधून अष्टविनायक प्रतिष्ठान गंगापूर, लासूर नाका या मंडळाचा लालबागचा राजा सिंहासनावर आरुढ असलेली २१ फूट उंचीची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी गंगापूर येथे चालली होती. दुपारी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करावयाची होती.
डाव्या बाजूच्या पुलाखालून गाडी जाईना, विरुद्ध बाजूने गाडी घातली, तरीही जाईना. यावेळी घोडेगावच्या नागरिकांनी मदत केली. जेसीबी आणत रस्ता साईडपट्टी खोदली. मोठ्या मुश्किलीने गाडी बाहेर काढली.
गाडी बाहेर निघताच गणपती बाप्पा मोरयाच्या जय घोषात मोठ्या आनंदाने सर्वांनी केला. ठेकेदारांच्या अनागोंदीमुळे पुलाचे विघ्न आले,नागरिकांच्या मदतीमुळे टळले ,पण आमचा मुहूर्त हुकल्याचे अष्टविनायक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते ऋषिकेश फटांगरे, राहुल गायकवाड यांनी सांगत खंत व्यक्त केली.





