ड्रोन उडवणे पडेल महागात! लग्नात, कार्यक्रमात ड्रोन वापरण्यापूर्वी हे वाचा ; प्रशासनाने जारी केले हे नवे नियम..जाणून घ्या

प्रभात वृत्तसेवा
पुणे – जिल्ह्यात कोणत्याही खासगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्यांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती सात दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून रितसर परवानगी घेणे बंधनकारक आहे.जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच दौंड, बारामती, शिरुर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. वाळू माफियाही टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता आहे. ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करुन इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता असल्याने हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
जिल्ह्यात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून आणि तत्सम सर्व हवेत उडणाऱ्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग करुन ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्यास कलम २३३ नुसार कारवाई होईल.





