Pakistan – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात पुराने थैमान घातले असून तब्बल २० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. गेल्या २४ तासात झालेल्या मुसळधार पावसाने नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आगामी ४८ तासात अतिवृष्टी होण्याचा इशारादेण्यात आला असून त्यामुळे पूरस्थिती अधिक बीकट होण्याची शक्यता आहे. कसूर, ओकारा, पाकपाट्टण, बहावलनगर आणि वेहारी येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. काही गावे पुराच्या पाण्याखाली गेली असल्याचे पंजाब प्रांतातील आपत्ती सेवा विभागाने म्हटले आहे. शनिवारपासून पुन्हा अतिवृष्टी सुरू झाल्याने सिंधू, चिनाब, रावी, सतलज आणि झेलम या नद्यांना पूर आला आहे. सतलज आणि रावी या नद्यांकाठच्या लोकांना हलवण्याचे काम पुर्ण झाले आहे, असे या विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. दिनांक २७ ऑगस्टपर्यंत नव्याने पर्जन्यवृष्टीचा इशारा दिला गेल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे काम सुरू करण्यात आले आहेसतलज नदीने गंडा सिंग वाला येथे धोक्याची पातळी गाठली आहे. सिंधू नदीच्या पाणी पातळीमध्येही वाढ होते आहे. सतलज नदीच्या किनाऱ्यावरील जलालपूर पिनवालासारख्याठिकाणची पूरस्थिती गंभीर बनली आहे. सरकारने नागरिकांना बचाव संस्थांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे आणि नद्या आणि कालव्यांजवळील मनोरंजनाचे उद्योग टाळण्याचा इशारा दिला आहे.