हिमाचल प्रदेशामध्ये पूरस्थिती; मनाली-लेह महामार्गासह 87 मार्ग बंद

Himachal Pradesh | हिमाचल प्रदेशात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी अचानक आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे मनाली-लेह राष्ट्रीय महामार्ग आणि इतर 87 रस्ते बंद झाले आहेत. त्याचबरोबर पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान खात्याने 7 आणि 8 ऑगस्टसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाममध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याच्या कामाला वेग आला आहे.
हिमाचल प्रदेश पोलिसांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे चंद्रभाग नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. लाहौल आणि स्पिती जिल्ह्यात दोन ठिकाणी अचानक पूर आला आणि जिंग जिंगबारजवळ मनाली-लेह राष्ट्रीय महामार्ग 3 वर पाणी आणि मलबा आले. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत दारचा आणि सरचू पोलीस चौकीवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सध्या सर्वच महामार्गावरील चिखल हटवण्यात व्यस्त आहे. हवामान खात्याने संपूर्ण राज्यात, विशेषत: कांगडा, हमीरपूर आणि चंबा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे आणि खराब हवामानाबाबत दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्याच्या इतर भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आणखी 1,401 प्रवाशांची केली सुटका
केदारनाथ पायी मार्गावर मुसळधार पावसामुळे पाचव्या दिवशीही विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची आणि स्थानिकांची सुटका सुरूच आहे. सोमवारी 1,401 लोकांची सुटका करण्यात आली. 645 प्रवासी आणि स्थानिक लोकांना एमआय-17, चिनूक आणि इतर हेलिकॉप्टरने, 584 जणांना पायी, 172 जणांना भिंबळी-लिंचोली-चौमासी मार्गाने बाहेर काढण्यात आले. पाच दिवसांत 11,775 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे.
नवसारी-वलसाडमध्येही धुमशान
गुजरातमधील नवसारी आणि वलसाड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. या भागातून 1000 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. नवसारी जिल्ह्यातील खेरगाम तालुक्यात सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत 229 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वलसाड जिल्ह्यात औरंग नदी धोक्याची पातळी ओलंडण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले…





