जामखेडमध्ये पाच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी : मुलीच्या आईने दिली पोलिसांत फिर्याद
जामखेड – शहरातील एका पाच वर्षीय चिमुरडीवर शेजारी रहाणाऱ्या विवाहित नराधमाने अत्याचार केला. या प्रकरणी मुलीच्या आईने रात्री उशिरा जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सचिन शालन पवार याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, आरोपीस श्रीगोंदा येथील न्यायालयात हजर केला असता, त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (दि. 21) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पीडित चिमुरडी ही शेजारी राहणारा आरोपी सचिन पवार (वय 32) याच्या घरी गेली होती. यावेळी आरोपी पवार याने तिच्यावर अत्याचार केला. तसेच हा प्रकार तू कोणाला सांगितला, तर मारण्याची धमकी दिली. सदरची घटना घडूनही भीतीपोटी पीडित चिमुरडीने ही घटना कोणाला सांगितली नाही. मात्र अत्याचार झाल्यावर चिमुरडीस त्रास होऊ लागल्याने तिने गुरुवारी (दि. 23) ही घटना आपल्या आईस सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने जामखेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
फिर्यादीवरून आरोपी विरोधात गुरुवारी (दि. 23) रात्री उशिरा अत्याचार व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी सचिन पवार यास राहात्या घरातुन ताब्यात घेतले.
आज (दि. 24) आरोपीस श्रीगोंदा येथील न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण हे करत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.





