Satara | पाचगणीत पर्यटकांच्या गाड्यांसाठी पार्किंग झोन

पाचगणी, (प्रतिनिधी) – पाचगणी येथील मुख्य बाजारपेठेत होणारी वाहतूक कोंडी आणि पार्किंगची सोय नसल्याने पर्यटकांची होणारी गैरसोय ओळखून आता जुने पोलीस ठाणे ते बसस्थानकापर्यंत पूर्ण मुख्य बाजारपेठ रस्ता हा पर्यटक गाड्या पार्किंग झोन केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे.
पाचगणीत वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या भेडसावत असल्याने पांचगणी पोलीस ठाणे, नगरपालिका आणि व्यापारी वर्ग यांची बैठक पालिकेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी सपोनि दिलीप पवार, पालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी बांधवांशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढला यामध्ये सर्व स्थानिक व्यापाऱ्यांनी आपले वाहन बाजारपेठेत अथवा स्वतःच्या दुकानासमोर न लावता पर्यटकांना पार्किंगसाठी जागा ठेवावी.
सर्व व्यापा-यांनी त्यांची वाहने ठरवुन दिलेल्या पार्कंगमध्येच पार्क करावीत.या बैठकीला व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.
वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर कारवाई
मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी सांगितले की, व्यापारी व पर्यटकांसाठी पे अँड पार्कची व्यवस्था शॉपींग सेंटर व राजलक्ष्मी पार्किंग तसेच नगरपालिकेचे पार्किंग येथे फ्री पार्किंगची व्यवस्था करणेत आलेली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या एकेरी वाहतुक, पार्किंग व्यवस्थेच्या नियमांचे कडक पालन करावे. वाहतूक पोलीस, व नगरपालिका यापुढे वाहतुकीचे नियम मोडणा-यांवर कडक कारवाई करणार आहे.





