दहापैकी पाच जागा महिलांसाठी

वाई -वाई तालुका पंचायत समितीच्या आरक्षणासाठी आज झालेल्या सोडतीमध्ये दहापैकी पाच जागा महिलांसाटी राखीव झाल्या. त्यापैखी एक जागा ओबीसी महिलेसाठी आरक्षित झाली आहे. त्यामुळे काही गणांत मातब्बर नेत्यांच्या राजकीय समीकरणांची उलथापालथ झाली आहे.
वाई तालुक्यातील पंचायत समितीच्या धोम, पसरणी, यशवंतनगर, बावधन, जांब, भुईंज, कवठे, ओझर्डे, केंजळ, बोपर्डी या 10 गणांसाठी आरक्षण सोडत वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले व गट विकास अधिकारी नारायण घोलप यांनी नागरिकांच्या उपस्थित जाहीर केली.
यामध्ये बावधन, पसरणी, यशवंतनगर गणातील मातब्बर राजकीय नेत्यांची राजकीय समीकरणांची उलथापालथ झाली तर जांब, ओझर्डे, कवठे व केंजळ गणात सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने पूर्व भागामधील जुन्या नव्या इच्छुक नेत्यांचे राजकारण आणखी पाच वर्षे रखडल्याने वाई तालुक्याचे राजकारण निवडणुकीच्या अगोदरच ढवळून निघाले आहे. यापूर्वीच्या वाई पंचायत समितीच्या असणाऱ्या आठ गणात वाढ होऊन यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत पंचायत समितीसाठी 10 गण करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा दोन जणांना नव्याने संधी उपलब्ध होणार आहे. तालुक्यातील लोकसंख्या रचनेनुसार अनुसूचित जमातीसाठी एकही जागा उपलब्ध नाही.
50 टक्के आरक्षणानुसार 10 जागांपैकी 5 जागांवर महिलांना संधी मिळणार आहे. पैकी एका ओबीसी महिलेला संधी उपलब्ध झाली आहे तर चार ठिकाणी सर्वसाधारण महिलांना प्रतिनिधित्व करता येणार आहे. एकूण लोकसंख्येच्या आधारे अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार मागील आरक्षण पाहता नवीन एका ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली आहे. गत पंचवार्षिक निवडणुकीमधील असणारे सर्व स्तरातील आरक्षण गृहीत धरून आरक्षण फिरवण्यात आले आहे. अनुसूचित जाती, ओबीसी व सर्वसाधारण महिलांची आरक्षण सोडत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे काढण्यात आली.
असे आहे गणनिहाय आरक्षण
गणांचे आरक्षण पुढालप्रमाणे. बावधन- अनुसूचित जाती, यशवंतनगर- ओबीसी, पसरणी- ओबीसी महिला, ओझर्डे- सर्वसाधारण महिला, केंजळ- सर्वसाधारण महिला, कवठे- सर्वसाधारण महिला, जांब- सर्वसाधारण महिला, भुईंज- सर्वसाधारण खुला, बोपर्डी- सर्वसाधारण खुला, धोम- सर्वसाधारण खुला





