Top 10 News : एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता ते CM विजय अडचणीत?..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या
Top 10 News : एकाच कुटुंबातील ५ जण बेपत्ता ते CM विजय अडचणीत?..; वाचा आजच्या टॉप दहा बातम्या

Top 10 News : १) येत्या 8 दिवसांत ऑपरेशन टायगर-3 होईल; शिवसेना आमदाराचा मोठा दावा
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर-3’ची जोरदार चर्चा सुरू झालीय. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी येत्या आठ दिवसांत मोठी राजकीय घडामोड होणार असल्याचा दावा केलाय. लोक येतात-जातात, काळजी करू नका. येत्या आठ दिवसांत ऑपरेशन टायगर-3 होईल आणि ब्रेकिंग न्यूज मिळेल, असे भोंडेकर म्हणालेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षाची ताकद वाढलीय. दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही ऑपरेशन टायगर-3चे संकेत देत अनेक आमदार आणि माजी मंत्री शिवसेनेत येणार असल्याचे म्हटलंय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणखी मोठे पक्षांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. (Top 10 News)
२) एकाच कुटुंबातील पाच जण बेपत्ता; मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात
नागपूरच्या धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील पाच सदस्य बेपत्ता झाल्याने खळबळ उडालीय. २४ जून रोजी सायंकाळी घराबाहेर पडलेले हर्षा, जितेंद्र, ईशिता, खुशी आणि कृष्णा परसवानी हे अद्याप परतलेले नाहीत. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर २९ जून रोजी धंतोली पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय. प्राथमिक तपासात कुटुंबातील एका सदस्यावर मोठे कर्ज असल्याची माहिती समोर आली असून, कर्जदारांचा तगादा टाळण्यासाठी त्यांनी घर सोडले असावे, या शक्यतेनेही तपास सुरू आहे. दरम्यान, बेपत्ता कुटुंबाच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन पुण्यात आढळल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तांत्रिक तपास आणि शोधमोहीम सुरू असून, प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जातोय. (Top 10 News)
३) मुंबईत पावसाचा चौथा बळी; दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून आणखी एका तरुणाचा जीव गेलाय. गोरेगावच्या आरे कॉलनीत दुचाकीवरून जात असताना १८ वर्षीय हसन रझा सय्यद याच्या डोक्यावर झाडाची मोठी फांदी कोसळली. गंभीर जखमी झालेल्या हसनला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची आरे कॉलनी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलीय. यापूर्वी कुर्ल्यात झाड कोसळून ६३ वर्षीय व्यक्तीचा, साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा, तर चेंबूरमध्ये झाड अंगावर पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. सलग घडलेल्या या दुर्घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, महापालिकेकडे तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी केली जात आहे. (Top 10 News)
४) 10 जुलैपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांसाठी 10 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सलग चार दिवसांच्या पावसामुळे देशातील पावसाची तूट 40 टक्क्यांवरून 27 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. या पावसामुळे खरीप पेरणीला वेग मिळण्याची आणि धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र अतिवृष्टीमुळे पूर, भूस्खलन आणि पाणी साचण्याचा धोका कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केलेय. पुढील काही दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Top 10 News)
५) राम मंदिर दानचोरी प्रकरणात नवा खुलासा; आरोपीने लाखो रुपये प्रेयसीला दिले
अयोध्या राम मंदिरातील दानचोरी प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. मुख्य आरोपी अविनाश शुक्लाच्या 15 लाख रुपयांहून अधिक आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू असून, त्याचा संबंध दानचोरीशी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत. तपासात अविनाशने एका मैत्रिणीला सुमारे 2 लाख रुपये रोख आणि महागडा मोबाईल भेट दिल्याची माहिती समोर आलीय. त्याच्या भावानेही अविनाशकडे वारंवार मोठी रोख रक्कम असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणानंतर राम मंदिरातील देणगी मोजणी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही देखरेख, कर्मचाऱ्यांवर कडक निर्बंध आणि पारदर्शक पद्धतीने देणगी मोजण्याची नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपीचे बँक व्यवहार, रोख रक्कम आणि संपर्कांची सखोल चौकशी सुरू आहे. (Top 10 News)
६) CM विजय अडचणीत? DMK, AIADMK आणि भाजपची राज्यपालांकडे तक्रार
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या अडचणीत वाढ झाली असून DMK, AIADMK आणि भाजपने त्यांच्याविरोधात राज्यपालांकडे तक्रार दाखल केलीय. मुख्यमंत्री विजय यांच्यावर आमदारांची फोडाफोड, सरकारी यंत्रणेचा गैरवापर आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत अधिकृत परवानगी नसलेल्या व्यक्तींना सहभागी करून घेतल्याचे आरोप करण्यात आलेत. DMK नेते आर. एस. भारती यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केलीय. तर भाजप आणि AIADMK नेही जॉन अरोकियासामी व विष्णू रेड्डी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलेत. दरम्यान, TVK पक्षाने सर्व आरोप फेटाळत जॉन आणि विष्णू हे मुख्यमंत्र्यांचे अधिकृत विशेष सल्लागार असल्याने ते सरकारी यंत्रणेचाच भाग असल्याचे स्पष्टीकरण दिलेय. या प्रकरणामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडालीय. (Top 10 News)
७) इराणला ट्रम्प यांची थेट धमकी; खामेनींच्या अंत्यविधीदरम्यान खळबळजनक विधान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत पुन्हा आक्रमक भूमिका घेत खळबळजनक विधान केले आहे. अमेरिकेची इच्छा झाली तर इराणच्या उर्वरित सर्वोच्च नेतृत्वाचा एका हल्ल्यात पूर्ण नायनाट करू शकतो, असा दावा त्यांनी केला. अमेरिकन वृत्तसंस्था Axios ला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीसाठी इराणचे अनेक वरिष्ठ नेते एकाच ठिकाणी जमले आहेत. “आम्ही इच्छिल्यास एका फटक्यात सर्वांचा अंत करू शकतो. मात्र तसे करणार नाही, कारण त्यानंतर चर्चेसाठी कोणीच उरणार नाही,” असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेने संवादाचा मार्ग खुला ठेवण्याची भूमिका कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Top 10 News)
८) मारुतीचा मोठा धमाका; ब्रेझा, बलेनो फेसलिफ्टसह नवी इलेक्ट्रिक MPV लवकरच बाजारात
मारुती सुझुकी भारतीय बाजारात तीन नवीन मॉडेल्स घेऊन येण्याच्या तयारीत असून, ब्रेझा फेसलिफ्ट, बलेनो फेसलिफ्ट आणि नवीन इलेक्ट्रिक MPV ची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. 2026 Maruti Brezza फेसलिफ्ट 23 जुलै रोजी लॉन्च होणार असून, त्यात 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, ADAS, व्हेंटिलेटेड सीट्स आणि नव्या डिझाइनसह अनेक आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. बलेनो फेसलिफ्टमध्ये नवीन ग्रिल, अपडेटेड इंटिरियर आणि विद्यमान 1.2-लिटर पेट्रोल इंजिन कायम राहणार आहे. तर वर्षाअखेरीस कंपनीची पहिली तीन-रांगांची इलेक्ट्रिक MPV बाजारात येण्याची अपेक्षा आहे. 49kWh आणि 61kWh बॅटरी पर्यायांसह ही इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये 543 किमीपेक्षा जास्त रेंज देऊ शकते. त्यामुळे मारुतीच्या आगामी लॉन्चकडे ग्राहकांचे लक्ष लागलेय. (Top 10 News)
९) श्रीलीलाचा बॉलिवूड डेब्यू पक्का? सैफ अली खानच्या मुलगा इब्राहिमसोबत झळकण्याची चर्चा
‘पुष्पा २’मधील गाजलेल्या आयटम साँगनंतर लोकप्रिय झालेली दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीला लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सुरुवातीला ती कार्तिक आर्यनसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत एन्ट्री करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, त्या चित्रपटाचे काम पुढे ढकलल्याने तिचा डेब्यूही लांबला आहे. आता श्रीलीला अभिनेता इब्राहिम अली खानसोबत ‘दिलर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय. कुणाल देशमुख दिग्दर्शित हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होत असून, दिवाळी 2026 च्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, या चित्रपटाबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालीय. (Top 10 News)
१०) ‘समोर खेळू की मागे मारू…’; अभिषेकने फलंदाजीसाठी घेतला युवा वैभवचा सल्ला
मँचेस्टर येथील दुसऱ्या टी-२० सामन्यात १५ वर्षे ९९ दिवस वय असताना पदार्पण करत वैभव सूर्यवंशीने सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. पदार्पणाच्या सामन्यात १४ धावा करणाऱ्या वैभवचा खेळपट्टीवरून सीनियर सहकारी अभिषेक शर्मासोबत झालेला एक संवाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मँचेस्टरच्या कठीण खेळपट्टीवर फलंदाजी करताना अभिषेकने वैभवला विचारलं की, “मी चेंडू सरळ मारू की मागच्या बाजूला खेळू?” यावर १५ वर्षांच्या वैभवने अत्यंत परिपक्वतेने उत्तर दिले, “चेंडूचा अंदाज नीट घे. चेंडू डबल बाऊन्स होतोय आणि त्याची उसळीही कमी आहे.” या दोघांमधील हा संवाद स्टंप माईकमध्ये कैद झाला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (Top 10 News)





