Jalgaon Family died : अक्ख कुटुंब संपलं, पण चिमुरडी बचावली, एकटी ‘दुर्गा’ मृतदेहांच्या बाजूला बसली रडत, हृदयद्रावक घटनेने हळहळ

Jalgaon Family died : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात 19 ऑगस्ट 2025 रोजी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. शेतातील मका पिकांचे रानडुक्करांपासून संरक्षण करण्यासाठी बंडू यु. पाटील आणि अलकाबाई बंडू पाटील यांच्या शेताला लावलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपणाला स्पर्श झाल्याने मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील ओसरानी गावातील मजूर कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतांमध्ये विकास रामलाल पावरा (वय 35), त्यांची पत्नी सुमन विकास पावरा (वय 30), त्यांचे मुलगे पवन (वय 4), कवल (वय 3) आणि विकास यांची सासू लीलाबाई जमसिंग पावरा (वय 60) यांचा समावेश आहे. या भयंकर दुर्घटनेतून विकास यांची दोन वर्षांची मुलगी दुर्गा पावरा आश्चर्यकारकरित्या बचावली.
दुर्गाचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पावरा कुटुंब मंगळवारी रात्री वरखेडी गावाजवळील शेतातून पायवाटेने जात असताना त्यांना कुंपणातील विद्युत प्रवाहाची माहिती नव्हती. कुंपणाला स्पर्श होताच पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी एका ग्रामस्थाला दुर्गा मृतदेहांजवळ रडताना दिसली. त्याने गावप्रमुख आणि पोलिसांना माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा दुर्गा एकटीच मृतदेहांजवळ बसलेली होती, हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. महिला पोलीस कर्मचारी मधुरा पवार यांनी दुर्गाला जवळ घेऊन सांत्वन केले. सध्या दुर्गा एरंडोल पोलीस ठाण्यात आहे, आणि तिच्या नातेवाइकांचा शोध सुरू आहे.
शेतमालकावर गुन्हा दाखल
पोलिसांच्या प्राथमिक तपासात शेतमालक बंडू यु. पाटील यांनी रानडुक्करांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बेकायदा विद्युत कुंपण लावल्याचे समोर आले आहे. या कुंपणामुळे दोन रानडुक्करांचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व तारा आणि वायर जप्त केल्या आहेत. शेतमालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





