Baramati : शेतजमिनीचे तापमान नियंत्रणासाठी पाचट महत्त्वाचे
Baramati : शेतकऱ्यांना कृषी योजनांसह आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांच्या उपस्थितीत मौजे ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

बारामती : ऊस पाचट शेतात ठेवल्यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित राहते, पाण्याची बचत होते, जमिनीतील गांडुळांची संख्या वाढते, जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो व जमिनीची सुपीकता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पाचट न जाळता त्याचे योग्य व्यवस्थापन करून जमिनीचे आरोग्य जपावे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले.
शेतकऱ्यांना कृषी योजनांसह आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांच्या उपस्थितीत मौजे ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम बारामती पंचायत समितीच्या सदस्या राजश्री भूषण टकले व सतीश जिजाबा टकले यांच्या शेतात घेण्यात आला.
यावेळी तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवरील विविध कृषी योजनांची माहिती दिली. तसेच मिनीकिट ज्वारी बियाणे, ज्वारी प्रकल्पांतर्गत शेतकरी बचत गटांची स्थापना, एफएफएस ॲपद्वारे खतांची बुकिंग प्रक्रिया, महिला प्रमाणपत्र काढणे तसेच एआय ॲपचा शेतीमध्ये होणारा उपयोग व त्याचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास प्रगतिशील शेतकरी राहुल घुले, दिलीप घुले, बापूराव घुले, नाना घुले, सुधीर टकले, पै. उमेश टकले, रविंद्र टकले सर, भिवा टकले, मयूर घुले, शामराव टकले यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
मंडळ कृषी अधिकारी बारामती संतोष पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपकृषी अधिकारी मीरा राणे व सहाय्यक कृषी अधिकारी ज्योती आडके यांनी ऊस पाचट व्यवस्थापनाचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून दिले. एक हेक्टर क्षेत्रातून साधारणतः १० ते १२ टन ऊस पाचट तयार होते. या पाचटाचे योग्य व्यवस्थापन व कुजवणी केल्यास सुमारे ४ ते ५ टन सेंद्रिय खत उपलब्ध होते. तसेच १० टन पाचट कुजवल्यामुळे जमिनीला अंदाजे ४० ते ५० किलो नत्र, २० ते ३० किलो स्फुरद व ७५ ते १०० किलो पालाश उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ऊस पाचट कुजविण्याची पद्धत
प्रति एकर क्षेत्रासाठी ४५ किलो युरिया, ५० किलो सुपर फॉस्फेट व ५ किलो पाचट कुजविणारे जिवाणू खत समप्रमाणात मातीमध्ये मिसळून पाचटावर टाकावे. पाचट सरीमध्ये दाबून घ्यावे. तसेच खोडव्याची बुडखे रिकामी करून धारदार कोयत्याने जमिनीलगत छाटणी करावी व शिफारशीनुसार बाविस्टीन या बुरशीनाशकाची फवारणी करावी. बगला फोडून त्यामधून रासायनिक खतांची मात्रा द्यावी,असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.





