फिट्चचा अहवाल : IT, अभियांत्रिकी, ऊर्जा क्षेत्रे शुल्काच्या जोखमीपासून दूर

नवी दिल्ली – भारतातील बड्या कंपन्याकडून अमेरिकेला थेट निर्यात कमी होते. अशा परिस्थितीत अमेरिकेने जरी भारतावर अतिरिक्त आयात शुल्क लावले तरी त्याचा भारतातील कंपन्यांच्या एकूण ताळेबंदावर फारसा परिणाम होणार नाही असे फिट्च अमेरिकन पतमानांकन संस्थेने नमूद केले आहे.
मात्र अमेरिकेने आतापर्यंत तरी भारतीय औषधावर अतिरिक्त आयात शुल्क लावलेले नाही. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला यातून वगळले आहे. मात्र भविष्यात जर अमेरिकेने या वस्तूवरही आयात शुल्क लावण्याचे ठरवले तर भारताच्या औषधी, इलेक्ट्रॉनिक्स आणि काही प्रमाणात सेमीकंडक्टर उद्योगावर याचा नकारात्मक परिणाम संभवतो.
माहिती तंत्रज्ञान कंपन्या अमेरिकेतील कंपन्यांना सॉफ्टवेअरची निर्यात करतात. या क्षेत्रावर कसलाही परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. भारतातील तेल आणि नैसर्गिक वायू,सिमेंट, इमारतीसाठीची उपकरणे, अभियांत्रिकी, दूरसंचार, युटिलिटीज या क्षेत्रातील भारतीय कंपन्यांची अमेरिकेला निर्यात कमी आहे. या कंपन्यांना भारतात पुरेशी बाजारपेठ आहे. त्यामुळे अमेरिकेचा निर्णयाचा या क्षेत्रावर परिणाम होणार नाही असे सांगण्यात आले.





