fishing boat: श्रीलंकेच्या सागरी हद्दीत भारतीय मच्छिमारांची बोट बुडाली, २ जण बेपत्ता

fishing boat | Sri Lankan – भारतीय मच्छिमारांची बोट बुडाल्याने दोन मच्छिमार बेपत्ता झाले आहेत, अशी माहीती श्रीलंकेच्या नौदलाने दिली आहे. या बोटीतील दोघेजण श्रीलंकेच्या कच्छाथीवू बेटापर्यंत पोहून आले. तर अन्य दोघेजण बेपत्ता झाले असल्याचे श्रीलंकेच्या नौदलाने म्हटले आहे.
तामिळनाडू आणि श्रीलंकेदरम्यानच्या पाल्कच्या समुद्रधुनीमध्ये कच्छाथीवू बेट आहे. या पाल्कच्या समुद्रधुनीमध्ये मासेमारी करण्यासाठी भारतीय मच्छिमार जात असतात. श्रीलंकेच्या सागरी हद्दीमध्ये मासेमारी केल्याबद्दल श्रीलंकेच्या नौदलाकडून या मच्छिमारांना नेहमी अटक केली जात असते.
नेहमीप्रमाणे भारतीय मच्छिमारांची बोट आज या पाल्कच्या समुद्रधुनीमध्ये मासेमारीसाठी गेली असतानाबोट उलटली. त्यातील दोन मच्छिमार कच्छाथीवू बेटापर्यंत पोहून गेले. त्यांना वाचवण्यात यश आले असून अन्य दोन मच्छिमारांचा शोध घेतला जात आहे, असे श्रीलंकेच्या नौदलाने सांगितले.
दिनांक १ ऑगस्ट रोजी भारतीय मच्छिमारांची नौका आणि श्रीलंकेच्या बोटीची धडक झाल्यामुळे एक मच्छिमार मरण पावला होता. तर आणखी एक जण बेपत्ता झाला होता.
दरम्यान श्रीलंकेच्या नौदलाने आणखी ८ भारतीय मच्छिमारांना अटक केली असून त्यांचा ट्रॉलरही ताब्यात घेतला आहे. या वर्षात श्रीलंकेच्या नौदलाने भारताच्या ३४१ मच्छिमारांना अटक केली आहे.





