Dehu Fish Mortality: वारीच्या उंबरठ्यावर देहूत खळबळ! पवित्र इंद्रायणीत शेकडो माशांचा मृत्यू; वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर?
Dehu Fish Mortality: आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर असताना देहू येथील इंद्रायणी नदीपात्रात शेकडो माशांचा मृत्यू; प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह.

Dehu Fish Mortality – अवघ्या काही दिवसांवर आषाढी वारी येऊन ठेपली आहे. लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र असलेली आणि संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी पावन झालेली इंद्रायणी नदी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज असायला हवी होती. मात्र याच काळात नदीपात्रात शेकडो मासे मृतावस्थेत आढळल्याने केवळ पर्यावरणीय संकटच नव्हे, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नदीतील वाढते प्रदूषण, जलपर्णीचा विळखा, सांडपाण्याचा अनियंत्रित विसर्ग आणि पाण्याच्या प्रवाहातील अडथळे या सर्व समस्यांकडे संबंधित यंत्रणांनी वेळेत लक्ष दिले असते, तर ही परिस्थिती टाळता आली असती का, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. दरवर्षी आषाढी वारीच्या काळात देशभरातून भाविक येथे येतात. इंद्रायणीत स्नान करून संतांच्या पालखीचे दर्शन घेण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे.
अशा वेळी नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर मासेमृत्यू झाल्याने श्रद्धाळूंसह पर्यावरणप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून नदीपात्रात मृत मासे दिसत होते. मात्र शनिवारी परिस्थिती अधिक गंभीर झाली आणि शेकडो मासे पाण्यावर तरंगताना तसेच नदीकाठावर वाहून आलेले आढळले. काही ठिकाणी दुर्गंधी पसरू लागल्याने स्थानिक नागरिकांना नदीकिनारी जाणेही कठीण झाले. जर प्रशासनाने या घटनेतून धडा घेतला नाही, तर भविष्यात केवळ मासेच नव्हे, तर इंद्रायणीचे संपूर्ण पर्यावरण धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वारकरी येण्यापूर्वीच नदीची स्वच्छता का नाही?
आषाढी वारीपूर्वी प्रशासनाकडून नदी स्वच्छतेसाठी विविध मोहीमा राबवल्या जातात. मात्र प्रत्यक्षात नदीपात्रातील जलपर्णी, प्लॅस्टिक कचरा आणि सांडपाण्याचा प्रश्न कायम असल्याचे चित्र दिसून येते. लाखो भाविक येणार असल्याची माहिती प्रशासनाला आधीपासून असतानाही नदीची प्रभावी स्वच्छता आणि पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी वेळेत का झाली नाही, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. श्रद्धेच्या नावाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली जाते, मात्र नदीच्या मूलभूत आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही होत आहे.
स्वयंसेवक उतरले, मात्र यंत्रणा गायब
घटनेनंतर आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घेत नदीपात्रातील मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरू केले. अनेक तास परिश्रम घेऊन त्यांनी नदीकाठ स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. मात्र एवढ्या मोठ्या घटनेत प्रशासनाच्या यंत्रणा सुरुवातीला सक्रिय का दिसल्या नाहीत, असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे. स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेणे स्वागतार्ह असले तरी अशा परिस्थितीत संबंधित सरकारी यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून कारवाई करणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त होत आहे.






